
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. मात्र तिथे निर्णय चुकला तर आय़ुष्यभरासाठी त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे काही खटकलं तर वेळीच माघार घ्यावी, असा सल्ला दिला जातो. उत्तर प्रदेशातही अशीच एक घटना घडली आहे.
उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यात लग्नाच्या शेवटच्या विधीच्यावेळी नववधूला नवरदेवाची एक गोष्ट खटकली आणि तिने लग्नच मोडले. अखेर नवरदेवाला नवरीशिवाय वरात परत घेऊन जावी लागली.
बलियातील मिश्रोली गावातल्या प्रियांका राजभर या तरुणीचे खेजुरी गावातील संदीप राजभर या तरुणाशी लग्न ठरले होते. 5 जूनला त्याच्या लग्नाची तारीख ठरली आणि दोन्हीकडे लगीनघाई सुरु झाली. लग्नमंडप सजला, हळद लागली आणि नवरदेव वरात घेऊन नववधूच्या घरी पोहोचला. वधूपक्षाने नवरदेवाचे दणक्यात स्वागत केले.
लग्नमंडपात नवरदेव-नववधू आले आणि लग्न विधींना सुरुवात झाली. सगळं काही आलबेल आहे असं वाटत होतं. मात्र शेवटचा विधी सुरु असताना नववधूच्या लक्षात आले की, नवरदेव दारुच्या नशेत आहे आणि त्याच्या तोंडात गुटखा आहे. ती प्रचंड संतापली.
आयुष्यभरासाठी ज्याच्यासोबत राहायचे आहे तो लग्नाच्या दिवशीही दारुच्या नशेत आलाय हे पाहून नवरी मुलगी संतापली. संतापाच्या भरातच तिने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. वरपक्षाने तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने कोणालाच जुमानले नाही. अखेर नवरदेवाला नववधूशिवाय वरात घेऊन परतावे लागले.





























































