उत्तर प्रदेशात गंगा किनाऱयावर मृतदेहांचा खच! 2 हजारांवर मृतदेह

कोरोनामुळे उत्तर प्रदेशात अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू असून, पवित्र गंगा नदी किनाऱयावर मृतदेहांचा खच पडला आहे. कानपूर, उन्नाव, गाझीपूर, बलिया या जिह्यात भयंकर स्थिती असून, 2 हजारांवर मृतदेह गंगेत वाहताना आढळले किंवा किनाऱयांवर दफन केले आहेत. यामुळे संसर्ग मोठय़ा प्रमाणावर पसरण्याची भीती आहे.

बनारस आणि गंगा नदी किनाऱयांवरील जिह्यात मृतदेह नदीत सोडण्याची प्रथा आहे. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून ज्या संख्येने मृतदेह आढळत आहेत ते दृश्य थरकाप उडविणारे आहे. अनेक मृतदेह कोरोनाबाधित रुग्णांचे असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे गंगेच्या किनाऱयावरील गावात संसर्ग पसरण्याचा धोका वाढला आहे. तसेच लाकडांची मोठी टंचाई असल्यामुळे किनाऱयावर हिंदू प्रथा-परंपरा बाजूला ठेवून तीन फूट खड्डय़ात दफनविधी करण्याची वेळ आली आहे.

दफनविधी आणि मृतदेहांची विटंबना

कनौज येथील महादेवी गंगा घाटाजवळ 350 मृतदेहांचा दफनविधी करण्यात आला. या मृतदेहांचे केवळ तीन फुटांवर दफन केले आहे. गंगेची पाणीपातळी वाढल्यास प्रेत वाहून दुसरीकडे जाण्याची भीती आहे.

प्रयागराजमध्ये गंगेत 13 मृतदेह आढळले. तीन मृतदेहांची ओळख पटली. उर्वरित 10 मृतदेह कोणाचे याचा उलगडा झाला नाही. पोलिसांनी अंत्यसंस्कार केले.

वाराणसीच्या सुजाबाद परिसरात सात मृतदेह मिळाले. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने त्यांचे दफन केले.

गंगा नदीत मृतदेह सोडून देऊ नयेत. यामुळे नदीचे प्रदूषण वाढते. मृतदेहांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात यावेत. गंगा किनाऱयावर एसडीआरएफ आणि पीएससी यांनी पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहे. सरपंच आणि ग्रामपंचायतींनाही या नियमांचे पालन करावे; अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
– मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

आपली प्रतिक्रिया द्या