
दिल्लीतील फरिदाबाद येथील नेमबाजी संकुलात एक धक्कादायक घटना घडली आहे. एअर पिस्तूल सिलिंडरच्या स्फोटामुळे राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज पुष्पेंद्र कुमारचा डावा अंगठ्याला दुखापत झाल्याची घटना 2 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली आहे. पुष्पेंद्र उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील असून तो भारतीय हवाई दलात कॉर्पोरल म्हणून काम करतो. घटनेनंतर त्याला तत्काळ आर अॅण्ड आर रुग्णालयात दाखल केले.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (एनआरएआय) अध्यक्ष कालिकेश सिंग देव यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितनुसार, पुष्पेंद्र कुमार भोपाळमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय चॅम्पिअनशीपसाठी या शुटींग रेंजमध्ये आपल्या प्रशिक्षकासह प्रशिक्षण घेत होते. प्रशिक्षणादरम्यान ही दुर्घटना घडल्याने त्यांच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. इंटरनॅशनल शुटींग स्पोर्ट फेडरेशनने शुटींग प्रशिक्षणासाठी काही नियमावली दिलेली असते आणि त्याचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक असते. जुने सिलिंडर वापरु नये, जास्त गॅस भरु नये आणि एक्स्पायरी डेट तपासणे या गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते. या दरम्यान बंदुकीत गोळी भरताना तो कॉम्प्रेसर फुटून ही दुर्घटना घडली आहे. आयएसएसएफच्या नियमावली पुस्तकातील नियम 6.2.4.2 नुसार ही प्रत्येक खेळाडूची जबाबदारी असते की, त्या सिलिंडरची वैधता तारीख तपासून घेणे. हे उपकरण नियंत्रणाद्वारे तपासले जाऊ शकते. मिळालेल्या माहीतीनुसार, नेमबाज पुष्पेंद्र कुमार याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर महिन्याभरात तो बरा होईल. सध्या जी आर अँड आर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.




























































