
सामना प्रतिनिधी । मुंबई
रुग्णांना उत्तम सेवा मिळण्यासाठी जे. जे. रुग्णालय त्याचबरोबर ग्रॅण्ड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एक ते चार संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येतील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले. तसेच कामा व आल्ब्लेस रुग्णालयामार्फत 250 खाटांचे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याबात प्रस्ताव सादर केला असून यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
जे. जे. तील रिक्त पदांबाबत अमीन पटेल आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावर महाजन यांनी माहिती दिली. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या निधीमधून गोरगरीब रुग्णांसाठी पिवळे रेशनकार्डधारक व अंत्योदय योजनेतील रुग्णांकरिता औषधे व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. स्वतंत्र संशोधन केंद्र निर्मितीकरिता व वन स्टाफ सेंटरच्या उभारणीकरिता रिचर्डसन ऍण्ड क्रुडास या केंद्र शासन अधिकृत कंपनीची जागा रुग्णालय प्रशासनास हस्तांतरित करण्याबाबत संचालनालयाने प्रस्ताव सादर केला असून त्यासाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.



























































