वडखळ-अलिबाग चौपदरीकरणाला कॉरिडॉरचा ब्रेक,महामार्ग रद्द होण्याच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अलिबाग

भूसंपादनामुळे गेली अनेक वर्षे रखडलेला विरार कॉरिडॉरचे काम मार्गी लावण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र त्याचा फटका अलिबाग-वडखळ चौपदरीकरणाला बसणार असून हा महामार्गच रद्द होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाच्या थंडावलेल्या कामाने त्याचे संकेत दिले आहेत. वास्तविक लोकसभा निवडणुकीआधी अलिबाग-वडखळ महामार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावरील वाहतूककोंडी फुटेल, अशी अपेक्षा असतानाच या कामाला विरार कॉरिडॉरचा ब्रेक लागल्याने अलिबागकरांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच वडखळ ते अलिबाग आणि दिघी ते माणगाव या दोन महामार्गांच्या रुंदीकरणाला भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. अलिबाग-वडखळ मार्गाची भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध झाली असून संयुक्त मोजणीचे कामही पूर्ण झाले असून लवकरच भूसंपादनाचे काम सुरू होणार होते. त्यासाठीचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. अलिबाग-वडखळ महामार्ग चौपदरीकरणासाठी 1700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील 900 कोटी रुपये हे भूसंपादनासाठी लागणार आहेत. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन हा मार्ग कॉँक्रीटीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय महामार्गावर 2.2 किलोमीटरचा बोगदा आणि साडेसात किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता काढला जाणार होता. सगळे काही सुरळीत सुरू असतानाच आता हा प्रकल्प रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या कॉरीडोरमुळे वडखळ-अलिबाग मार्गाच्या रुंदीकरणात खोडा निर्माण झाला आहे.

– मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अलिबाग ते विरार दरम्यान मल्टी कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे. 2008 साली यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला होता.
– भूसंपादनातील अडचणींमुळे आणि निधीची कमतरता यामुळे गेली दहा वर्षे या प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. आता या प्रकल्पासाठी लागणारी 60 टक्के जमीन सिडकोने देण्याची तयारी दर्शवली आहे.
– प्रकल्पासाठी अर्थपुरकठा करण्यास कित्तीय संस्थांनी तयारी दाखकली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अलिबागकरांच्या नशिबी निराशा

अलिबाग विरार कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यात विरार ते पनवेल दरम्यानच्या द्रुतगती मार्गाचे काम होणार आहे. त्यामुळे अलिबागकरांना विरार मल्टी कॉरिडॉरसाठी आणखीन काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे, तर अलिबाग-वडखळ महामार्ग हा पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम सध्या अस्तित्वात असणाऱ्या मार्गाचे 10 मीटरपर्यंत रुंदीकरण करणार असून त्यासाठी एमएमआरडीए निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रशांत फेगडे यांनी दिली.