
पर्यावरण, निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धनाचा वसा घेतलेल्या वाकोल्यातील यशवंतनगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली परंपरा कायम ठेवत या वर्षीही कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या साडेसहा फुटी गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. सूर्यमंदिरात विराजमान झालेल्या या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा उंदड प्रतिसाद मिळत आहे.
मंडळाचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 38 वर्षे मंडळाची वाटचाल सुरू आहे. मंडळाची स्थापना झाल्यापासून पीओपी तसेच इतर पर्यावरणाला घातक ठरणारे घटक टाळून शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवली जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून कागदाच्या लगद्यापासून माटुंगा येथून चितळे यांच्या गणेशशाळेतून बनवलेली मूर्ती आणली जात असून मूर्तीला सिद्धेश पांढरकामे यांनी सजावट केली आहे. गर्दी होऊ नये आणि सुरक्षेच्या कारणामुळे पुण्याच्या धर्तीवर मंडपासमोरून थेट बाप्पा समोर उभे राहून भाविकांना दर्शन घेता येते. गणेशोत्सवादरम्यान विविध स्पर्धांबरोबर वैद्यकीय शिबीर, संगीतप्रेमींसाठी स्थानिक गायकांचा कार्यक्रम असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. मंडळाचे अध्यक्ष गोविंद गायकर, चिटणीस भरत परुळेकर असून मंडप, सजावट तसेच भाविकांना इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्तांनी गेले महिनाभर मेहनत घेतली.



























































