
सामना प्रतिनिधी । अलिबाग
वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली व जांभुळपाडा येथील १९५० साली बांधलेल्या जांभुळपाडा पुलाची दूरवस्था झाली आहे.
वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली व जांभुळपाडा येथील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या ६९ वर्षापूर्वीच्या जांभुळपाडा या पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यामुळे हा पूल वाहनांसाठी धोकादायक झाला असून अपघाताची शक्यता आहे. एमएसआरडीसी याबाबत वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. सुमारे ६९ वर्षापूर्वी बांधलेल्या या पुलावरून वाहनांची कायम ये-जा असते. मात्र, ६९ वर्षापूर्वीच्या वाहनसंख्येच्या तुलनेत आताच्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एखादे अवजड वाहन या पुलावरून जात असल्यास धोका वाढतो. पुलाचे संरक्षण लोखंडी कठडे तुटले आहेत. त्यामुळे वाहने पुलावरून कोसळून खाली नदीत कोसळण्याचा धोका आहे.
याबाबत वेळीच दुरुस्तीचे काम करण्याची गरज आहे. पाली-वाकण मार्गावर असलेला आंबा नदीचा पूल धोकादायक झाला आहे. पुलाचे संरक्षक कठडे कमकुवत व तुटलेले आहे. पुलावरुन क्षमतेपेक्षा तिप्पट वजनाची वाहतूक होत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) कमकुवत झाले आहेत. काही ठिकाणी तुटले आहेत. पालीच्या पुलावरुन गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलाचे संरक्षक कठडे तोडून एक मोटार नदीत कोसळून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. या वर वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे नाहीतर सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.





























































