
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निरामय आरोग्यासाठी पंढरपूरमधील वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळी अन् शिवसैनिकांनी श्री विठ्ठल मंदिरातील श्री संत नामदेवरायांच्या समाधीचे पूजन करून मुख्यमंत्र्यांना लवकर बरे कर, असे साकडे श्री विठ्ठलाला घालण्यात आले.
मुंबई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारातून ते लवकर बरे व्हावेत यासाठी श्री विठ्ठलाला साकडे घालण्यात आले.
या वेळी ह.भ.प. तात्या महाराज चौगुले, ह.भ.प. सतीश महाराज कंधारकर, ह.भ.प. नारायण दिघे यांच्यासह वारकरी भाविक उपस्थित होते. या वेळी बोलताना ह.भ.प. तात्या महाराज चौगुले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने नव्हे तर राज्यातील सामान्य जनतेचे कुटुंबप्रमुख म्हणून कोरोनाच्या संकट काळात उद्धव ठाकरे यांनी जनतेची अतिशय काळजी घेतली आहे. कोरोनाचे संकट दूर होताच विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले केल्याने आता कार्तिकी वारीच्या ओढीने भाविक पंढरपूरकडे येऊ लागले आहेत. अशातच 65 वर्षांवरील वृद्ध आणि लहान बालके यांनाही मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. ते या आजारातून लवकर बरे होवोत आणि त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो यासाठी आज संत नामदेव महाराज यांच्या समाधी स्थळी विधिवत पूजा करून, तुळशी अर्चना करून भाविकांच्या वतीने साकडे घालण्यात आले. या वेळी मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




























































