तर वेदांताने पुन्हा महाराष्ट्रात यावे; आदित्य ठाकरे व्यवस्थापनाला लिहिणार पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे सरकारच्या निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनसारखा दीड लाख रोजगार देणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आता वेदांताला गुजरातमध्ये गुंतवणूकदार मिळत नाहीत.  त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात पुन्हा यायचे असेल तर सरकारने पुढाकार घेतला पाहिजे असे सांगतानाच, आपणही यासंदर्भात वेदांताच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिणार आहोत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभाला जाणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारला. त्यावर, हा निर्णय महाविकास आघाडी घेईल आणि तो आम्हाला मान्य असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वरळीतील रखडलेल्या कामांबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार

‘दीड वर्षापासून वरळीमध्ये रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे सुरू आहेत. जवळपास 92 कोटींची थकबाकी सरकारने दिलेली नाही. या सर्व कामांचे पेमेंट न झाल्यामुळे सध्या काम अर्धवट स्थितीत आहेत आणि याचा सामना स्थानिक पोलीस कुटुंबीयांना करावा लागत आहे. पोलीस कुटुंबीयांच्या धोकादायक इमारतींचे काम आम्ही सुरू केले. मात्र त्याचेदेखील पेमेंट न दिल्याने ते काम बंद पडले आहे. ही जुनी घर आहेत केव्हाही पडू शकतात जर या कामाचे पैसे दिले गेले नाहीत तर अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे लवकरच मी स्वतŠ या संदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहून रोखलेला फंड सुरू करण्याची मागणी करणार आहे. नवीन साडेनऊशे फ्लॅट पोलीस बांधवांसाठी बांधण्यात येणार होते. मात्र ते देखील काम आता बंद केले आहे.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांनी दिल्लीला झुकवले, गद्दार दिल्लीपुढे झुकले

बाळासाहेब ठाकरे कधीही मागे हटले नाहीत. त्यांनी दिल्लीला झुकवले होते. पण गद्दार सुरतेला पळून गेले. त्यांनी महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचे काम केले आहे, अशी तोफ आदित्य ठाकरे यांनी डागली.  या गद्दारांना कळायला हवे की, यांनी गद्दारी कोणाशी केली आहे. त्यांना थोडी तरी लाज वाटायला हवी. त्यांनी कोणाच्या घराला संपवायचा प्रयत्न केलाय हे त्यांना कळायला हवे, असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढवला.