पाऊस लांबल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली

17

सामना प्रतिनिधी । धुळे

धुळे जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिणामी सर्वच प्रकारच्या भाजीपाल्यात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एरव्ही मातीमोल दराने विकली जाणारी कोथिंबीर सध्या 150 रुपये प्रतिकिलो झाली आहे. पालेभाज्या आणि फळभाज्या सरासरी 40 ते 60 रुपये प्रतिकिलो झाल्या आहेत. भाजीपाला उत्पादनास विलंब होत असल्याने अजून काही काळ भाजीपाल्याचे दर कडाडलेले असतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

जिल्ह्यात यंदा वळवाचा आणि मृग नक्षत्राचा पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन लांबले आहे. फळभाज्यांची लागवड करण्याइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियांची लागवड करण्यास विलंब केला. साहजिकच भाजीपाला उत्पादन घटले. भाजी मंडईत आवकही कमी झाली. परिणामी गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर किलोमागे सरासरी 10 रुपयांनी वाढले. टोमॅटो, मिरची, वांगे, भेंडी, फ्लॉवर कोबी, पानकोबीची आवक लक्षात घेऊन दर चाळीस ते साठ रुपये प्रतिकिलो आहेत.

कधी काळी भाजीपाला मोठय़ा प्रमाणात खरेदी केला तर काही प्रमाणात कोथिंबीर सहज मोफत दिली जात असे, पण सध्या पाणी नसल्याने अनेक पालेभाज्यांचे उत्पादन थांबले आहे. त्यात कोथिंबीरचाही समावेश आहे. किरकोळ बाजारात ग्राहकासाठी कोथिंबीरचा दर सध्या किमान 150 रुपये प्रतिकिलो आहे. एकूणच मंडईतील भाजीपाल्याची दरवाढ पाहता मध्यम वर्गीय गृहिणींनी सध्या तरी भाजी मंडईकडे पाठ फिरविली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या