
पुण्याकडून नगर शहराकडे येणार्या दुचाकी, चारचाकी व सर्व प्रकारच्या वाहनांसाठी केडगाव बायपास चौकात बॅरीकेट्स लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमाव बंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. खासगी वाहनांना रस्त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. असे असताना पुण्याहून नगरकडे मोठ्या प्रमाणात वाहने येत आहेत. त्यामुळे या वाहनांना अटकाव करण्यासाठी केडगाव बायपास चौकात बॅरीकेट्स लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच येथे पोलीस बंदोबस्त असून पुण्याहून नगर शहरात येणार्या वाहनांना कल्याण रोड बायपास चौक मार्गे वळविण्यात आले आहे. तेथे सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहनात येणार्या नागरिकांचे नाव व पत्ते, दूरध्वनी क्रमांक आदी माहिती घेतली जात आहे. त्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जात आहे.




























































