
मराठी चित्रपटसृष्टीतील रुबाबदार, देखणा नायक आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जुन्या काळातील अभिनेत्री दुर्गाबाई कामत यांचे पणतू, त्यांच्या कन्या कमलाबाई गोखले यांचे नातू आणि अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र असल्याने विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा घरातूनच लाभला होता. महानंदा, बाळा गाऊ कशी अंगाई, कळत नकळत, वजीर असे मराठी चित्रपट तर कमला, बॅरिस्टर, संकेत मिलनाचा, नकळत सारे घडले अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं सामर्थ्य दाखवलं. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला असा ठसा उमटवला. भूलभुलैय्या, हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, मिशन मंगल अशा अनेक चित्रपटांमधूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. अग्निहोत्र, अल्पविराम, या सुखांनो या अशा मराठी- हिंदी मालिकांमधूनही ते झळकले होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट-मालिका आणि नाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.





























































