
ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. पंडित लिमये हे सहली निमित्ताने गुवाहाटी येथे गेले असता त्यांच्यावर काळाने घाला घातला. उद्या 1 जून रोजी दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. दुपारी अडीचनंतर 405, बी विंग, वसंता, दोस्ती विहार, दोस्ती रस्ता, ठाणे (पश्चिम) येथे निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येणार आहे. लिमये यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पंडित चंद्रकांत लिमये हे नाट्य, शास्त्रीय संगीतातील श्रेष्ठ गायक दिवंगत पंडित वसंतराव देशपांडे यांचे उत्तराधिकारी शिष्य होते. वसंतराव देशपांडे यांच्याकडे लिमये यांनी तब्बल बारा वर्षे गुरुकुल पद्धतीने गाण्याचे धडे घेतले. वसंतराव देशपांडे यांचे ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक प्रचंड गाजले. या नाटकात वसंतराव यांनी स्वतः काम केले असून लिमये यांना त्यात ‘चांद’ ही भूमिका करायची संधी मिळाली. मात्र वसंतराव यांच्या पश्चात लिमये यांना याच नाटकातील वसंतराव यांनी लोकप्रिय केलेली ‘खाँसाहेब आफताब हुसेन’ ही भूमिका करायची संधी मिळाली. वसंतराव यांनी लिमये यांना आपल्या गायकीचे उत्तराधिकारी मानले.
मराठी अभंग, रागाची निर्मिती
पंडित लिमये यांनी गायलेल्या मराठी अभंगांची ‘भक्तीयात्रा’ ही ध्वनिफीतही प्रकाशित झाली आहे. ज्येष्ठ संगीतकार दिवंगत स्नेहल भाटकर यांनी हे अभंग संगीतबद्ध केले आहेत. ‘जयध्वनी’ या जोडरागाची आणि ‘चंद्र मोहिनी’ या स्वतंत्र रागाची निर्मितीही लिमये यांनी केली होती. तसेच ‘देखादेखी’सह अनेक बंदिशी आणि तराणे त्यांनी बांधले आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आजचा दिवस माझा’ या मराठी चित्रपटात लिमये यांनी अंध गवईची भूमिका साकारली होती.
आईवडिलांकडून गाण्याचा वारसा मिळाला
लिमये यांचे वडील गणेश लिमये यांनी नथूबुवा कथ्थक यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले होते. तर आई विमल लिमये या माटेबुवांकडे संवादिनी शिकल्या होत्या. त्यांना आईवडिलांकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉ. वसंतराव राजोपाध्ये, गायक पंडित नारायणराव व्यास, पंडित गजाननबुवा जोशी, सी. पी. उर्फ बाबुकाका रेळे, आग्रा घराण्याचे गायक बालकराम जाधव, जयपूर घराण्याचे गायक पंडित रत्नाकर पै यांच्याकडे गाणे शिकले.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
पंडित लिमये यांना त्यांच्या दीर्घ सांगितिक कारकिर्दीत ‘सूर संसद’चा ‘सूरमणी’ पुरस्कार मिळाला. कॅनडा, अमेरिकेत त्यांनी ‘भारतीय शास्त्रीय संगीत’, नाट्यसंगीत आणि मराठी अभंग या विषयांवर व्याख्याने व सादरीकरण केले आहे. शास्त्रीय संगीतासाठी केंद्र सरकारची ‘सीनियर फेलोशिप’ त्यांना मिळाली. महाराष्ट्र कलानिकेतनतर्फे ‘महाराष्ट्र वैभव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठाण्यातील सिद्धकला संगीत अकादमीतर्फेही विशेष पुरस्कार देण्यात आला. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘स्वर रंगराज’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.



























































