
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे कार्टून असलेला व त्यावर अपशब्द वापरलेला फोटो फेसबुकवरून शेअर केल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता ऋषी मालविया याला अटक केली. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
ऋषी मालविया हा डहाणूत राहतो. तो विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ताही आहे. त्याने फेसबुक वॉलवरुन उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केली. त्याचे संतप्त पडसाद उमटले. शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा, माजी आमदार अमित घोडा, जिल्हा उपप्रमुख संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी ऋषी मालवियाविरोधात पोलीसात कारवाईची मागणी केली. या तक्रारीनंतर ऋषी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी तो स्वतःहून पोलीसांना शरण आला.





























































