
रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या वैयक्तिक शतकी धमाक्यासह द्विशतकी सलामीमुळे हिंदुस्थानने उभारलेल्या 9 बाद 385 धावांचा पाठलाग न्यूझीलंडचा संघ करू शकला नाही. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवच्या प्रभावी माऱयापुढे पाहुण्यांचा संघ 295 धावांतच आटोपला आणि हिंदुस्थानने तिसरा सामना 90 धावांनी जिंकत तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादले.
हिंदुस्थानने दिलेले 386 धावांचे आव्हान डेव्हन कॉनवेच्या घणाघाती 138 धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडला शक्य वाटत होते. त्याने हेन्री निकोल्सबरोबर 106 तर डॅरिल मिचेलसह 78 धावांची करून न्यूझीलंडसाठी जोरदार खेळ केला, पण कॉनवे बाद होताच न्यूझीलंडचा डाव विजयापासून पराभवाच्या ट्रकवर घसरला. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवच्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर आटोपला.
तत्पूर्वी, हिंदुस्थानच्या सलामीवीरांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यानुसार हिंदुस्थानची धावसंख्या किमान 400 च्या पलीकडे असायला हवी होती, पण सलामीची जोडी सलग षटकांत बाद झाल्यावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी मिळविलेल्या यशामुळे हिंदुस्थान 400 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. न्यूझीलंडने हिंदुस्थानचा 385 धावांवर रोखले. हे न्यूझीलंडचे यश आहे. 26 षटकांत 212 धावा करणाऱया हिंदुस्थानला शेवटच्या 24 षटकांत 8 फलंदाज गमावत फक्त 173 धावाच काढता आल्या.
शुभमनचा विश्वविक्रम
शुभमनने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुसरे शतक ठोकताना 360 धावा काढल्या. तीन वन डेंच्या मालिकेत एका फलंदाजाकडून काढल्या गेलेल्या या विश्वविक्रमी धावा आहेत. बाबर आझमनेही 2016 साली विंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत 360 धावा केल्या होत्या. त्या विक्रमाची गिलने आज बरोबरी साधली. या आधी हिंदुस्थानकडून तीन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा विराट कोहलीने विंडीजविरुद्ध (283) केल्या होत्या.
निराशाच निराशा
इतकी भन्नाट आणि वेगवान सुरुवात मिळाल्यानंतर सर्वांनाच मोठय़ा फटकेबाजीची संधी होती; पण विराट कोहली, ईशान किशनने निराशा केली. कोहली आज चांगल्या मूडमध्ये होता. पण त्याने सर्वप्रथम मूडऑफ केला. कोहली 37 तर ईशान 17 धावांवर बाद झाला. पुढे हिंदुस्थानी ‘थ्रीसिक्टी डिग्री’ सूर्यकुमार यादवही अपयशी ठरला. वॉशिंग्टन सुंदरनेही निराश केले. अपवाद फक्त हार्दिक पंडय़ा (54) आणि शार्दुल ठाकूरचा (25). दोघांनी केलेल्या 54 धावांच्या भागीमुळे हिंदुस्थानला 375 धावा गाठता आल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान ः 50 षटकांत 9 बाद 385 (रोहित शर्मा 104, शुभमन गिल 112, विराट कोहली 36, हार्दिक पंडय़ा 54, शार्दुल ठाकूर 25 ; जेकब डफी 10-0-100-3, ब्लेअर टिकनर 10-0-76-3
न्यूझीलंड ः 41.2 षटकांत सर्वबाद 295
(डेव्हन कॉनवे 138, हेन्री निकोल्स 42, डॅरिल मिचेल 24, मिचेल ब्रेसवेल 26, मिचेल सॅण्टनर 34; शार्दुल ठाकूर 6-0-45-3, कुलदीप यादव 9-0-62-3, युजवेंद्र चहल 7.2-0-43-2).



























































