Video ‘हा यू टर्न आता चालणार नाही’, जुना व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिलासंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना आणि एक त्यांच्या आताच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे असे सांगत राज्य सरकारवर टीका केली होती. मात्र आता जेव्हा शिंदे गट व भाजपचे सरकार असताना राज्य सरकारकडून विजबिलमाफी होत नाहीए. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी मध्य प्रदेश सरकारच्या शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचे कौतुक केले होते. तसेच त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करत असल्याची टीका केली होती.

आता राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या वीज बिल माफी बद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेले नाही. काही शेतकऱ्यांचे वीज बिल कनेक्शनही कापले आहे. त्याबाबत विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी  वीजबिल भरले नसलेल्यांकडून फक्त एक बिल आता घ्यावे त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून वसूली करता येईल असे म्हटले आहे.

भाजपचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या युटर्नवरून सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे. ”विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करीत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती” अशी टीका सुळे यांनी केली आहे.