
विद्याविहार, घाटकोपर परिसरात असलेल्या नौसेनेच्या वसाहत आणि वखारीजवळ बांधकाम करण्यास मनाई असल्यामुळे 350हून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास रखडला आहे. संरक्षण खात्याने एनओसी संदर्भातील नियम शिथिल करून 2500हून अधिक कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन खासदार विनायक राऊत यांना आज दिले.
विद्याविहारमधील किरोळ, खलईगाव आणि घाटकोपरमध्ये चिराग नगर, नारायण नगर या परिसरात नौदल वसाहती आणि वखार आहे. संरक्षण खात्याच्या अंतर्गत हा सर्व परिसर येतो. नौदलाची या परिसरात 500 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करायला मनाई आहे. मात्र याच ठिकाणी 10 मीटरच्या अंतरावर अनेक 10-15 मजली इमारती आहेत तर भूदलाच्या परिसरात 10 मीटरच्या पुढे बांधकाम करण्याची परवानगी आहे. त्यामुळे संरक्षण दलाने नागरी परिसरात असलेल्या नौदल, भूदल आणि वायुसेना वसाहती आणि आजूबाजूच्या परिसरासाठी निश्चित अंतराचे धोरण ठरवून गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी एनओसीच्या अंतराबाबत नियम निश्चित करावा तसेच विद्याविहार, घाटकोपरमध्ये असलेला 500 मीटरच्या अंतराचा नियम शिथिल करून हजारो रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी आणि सचिन भांगे यांनी लोकसभेचे गटनेते, शिवसेना खासदार विनायक राऊत यांना निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले.



























































