बोध घेतलेला बरा

जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. लोकांना गृहित धरले की काय घडू शकते याचे प्रत्यंतर बिहारमधले एक मंत्री विजयकुमार सिन्हा यांना आले आहे.

‘सुशासनबाबू’ म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा डंका सगळीकडे वाजवला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी आहे काय, असा प्रश्न एका विद्यमान मंत्र्यावर जनतेचे शेण फेकून मारल्यामुळे निर्माण झाला आहे. लखीसराय मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदराकीसाठी विजयकुमार सिन्हा आसुसलेले असले तरी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जनता मात्र कमालीची संतप्त झाली आहे.

इतर राजकीय नेत्यांप्रमाणे सिन्हा यांनीही आपल्या मतदारसंघातली जनतेला याव करू त्यांव करू अशी भरमसाट आश्वासने देत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले होते. त्यानंतर हे सिन्हा महाशय सुशासनबाबूंच्या मंत्रिमंडळात पाच वर्षे कॅबिनेटमंत्री म्हणून राहिले. मात्र पाच वर्षांत त्यांना मतदारसंघाची आठवणही झाली नाही एवढे ते विकास कार्यात ‘बिझी’ राहिले. आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर मंत्रिमहोदय दोन्ही हात जोडून मतदारराजाच्या दर्शनाला आले असताना जनता जनार्दनाने शेणाचा मारा करून प्रतिक्रिया व्यक्त केली.

सिन्हा यांच्या उदाहरणावरून एकदंरीतच सकल बिहारमध्ये ‘विकासाची कोसी’ कशी वाहिली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. सिन्हा यांना प्रसाद मिळाल्यामुळे आता फेकंफाक करणाऱया राजकीय नेतमंडळींनी योग्य तो बोध घेतलेला बरा. जनतेला सदा सर्वकाळ बेवकूफ बनवता येत नाही. जनता संतापली तर कपडय़ांवर शेणही पडू शकते, हे आता संबंधितांनी लक्षात ठेवावे इतकेच…!

आपली प्रतिक्रिया द्या