
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी हटविण्यासाठी निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द पूर्ण केल्याने मतदारांसह जिल्ह्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता, अशा शब्दात वडेट्टीवार यांचे कौतुक होत आहे.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील दारूबंदीच्या विषयावर सभा गाजल्या. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर दारूबंदी’ ‘उठवू, असा शब्द दिला. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे दारूबंदीच्या विषयावरून वडेट्टीवार यांना अनेकांनी टार्गेट केलं होते. मात्र, विरोधकांना न जुमानता वडेट्टीवारांनी मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या नेतृत्वात एक समिती गठित केली होती. या समितीनेसुद्धा दारूबंदीच्या अपयशावर प्रकाश टाकला होता. या समितीच्या अहवालाचा आधार घेत राज्य सरकारने झा यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय अभ्यास समिती स्थापन केली. या समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केल्यानंतर चर्चा सुरू झाल्या.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार जेव्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर यायचे तेव्हा माध्यमांची प्रतिनिधी दारूबंदीच्या प्रश्नावर त्यांना विचारणा करत होते. दारूबंदी कधी उठणार, हा नियमित प्रश्न होता. वडेट्टीवारही ठामपणे सांगायचे महिनाभराने उठणार, कोरोना संपल्यानंतर उठणार. त्यामुळे दारूबंदीच्या मुद्द्यावर वडेट्टीवार नागरिकांची दिशाभूल करीत असल्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, दारूबंदी उठणारच असे वडेट्टीवार ठामपणे सांगत होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीचा विषय उपस्थित करण्यात आला आणि जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याचा सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला. हे वडेट्टीवार यांचे मोठे राजकीय यश आहे. “दिला शब्द केला पूर्ण” या उक्तीला त्यांनी सार्थ ठरवत वेगळी ओळख कायम केली.




























































