अभिनेते विक्रम गोखले यांना पुलोत्सव सन्मान प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

आर्ट सर्कल रत्नागिरी आणि आशय सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आज पासून रत्नागिरीत पुलोत्सवास प्रारंभ झाला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुलोत्सव सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सतीश आळेकर यांच्या हस्ते  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी व्यंगचित्रकार चारूहास पंडीत, आशय सांस्कृतिकचे विरेंद्र चित्राव, नगराध्यक्ष राहूल पंडीत, भालचंद्र तेंडूलकर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, “हा पुलोत्सव फक्त पुलप्रेमींचा नव्हे तर साहित्यप्रेमींचा व्हावा अशी अपेक्षा आहे. जेव्हा मला एका मुलाने पुलं कोण म्हणून विचारले त्याक्षणी मी भयभीत झालो. पु.लं.चे साहित्य वाचले पाहिजे त्यांनी संवेदनशील माणसालाही हसवलं आहे. गुदगुदल्या केल्या आहेत” असे विक्रम गोखले म्हणाले.

त्यानंतर विक्रम गोखले यांची राजेश दामले यांनी प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीत विक्रम गोखले यांनी पु.ल.देशपांडे यांच्या आठवणी सांगितल्या. आहे मनोहर तरी वाचल्यावर पुलंना पत्र लिहिले होते. अखेर एक दिवस मला सुनीताबाईंचे पत्र आले त्या पत्रात लिहिलं होतं की आम्ही दोघेही आजारी होतो म्हणून तुझ्या पत्राचे उत्तर द्यायला उशिर झाला. तसेच आहे मनोहर तरी या पुस्तकाचे तू केलेले विश्लेषण वाचल्यावर तुला कोणत्या शब्दात उत्तर द्यायचे याचा मी विचार करत होते. अशा शब्दात लिहिलेले ते पत्र मी जपून ठेवलंय असं अभिनेते विक्रम गोखले यांनी सांगितले.