
सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुस्थानच्या ग्रामीण भागांमधील उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून तेथील लोकांना उदरनिर्वाहाचे मार्ग निर्माण करण्याइतके सक्षम बनवायचे आणि त्यातून ग्रामीण विकास साधायचा असे आदर्श मॉडेल पवईच्या आयआयटी मुंबईतील संशोधकांनी बनवले आहे. गावांमध्ये हे मॉडेल राबवले गेले तर ग्रामीण भागांतील गरिबी दूर करण्याचा उद्देशही साध्य करता येईल असा संशोधकांचा दावा आहे.
आयआयटी मुंबईतील प्राध्यापक रोनिता बर्धन आणि केंब्रिज विद्यापीठाचे रामित देबनाथ यांनी हे ‘रिसोर्स सिम्बॉयसिस’ मॉडेल अभ्यासपूर्वक बनवले आहे. देशातील 64.4 टक्के लोकसंख्या आजही ग्रामीण भागात राहते. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पायाभूत सुविधा पुरवतानाच त्यांना कौशल्याचे धडेही दिले. त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन ग्रामीण भागातील गरिबी 55 टक्क्यांवरून कमी होऊन 28 टक्क्यांपर्यंत आली. या विविध योजना राबवून, रोजगार देऊनही गरिबी दूर करण्याचा उद्देश काही प्रमाणातच यशस्वी झाला असे या संशोधकांना अभ्यासाअंती आढळले.
महाराष्ट्रातील शिंगणापूर गावामध्ये आयआयटीच्या संशोधकांनी हे मॉडेल राबवले. त्या गावामध्ये 920 घरे आहेत. तेथील लोकसंख्या, पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा, उत्पन्न, गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाची साधने, गावातील उद्योग, जमिनीचा वापर याचे सर्वेक्षण केले गेले. त्यात असे दिसून आले की गावामध्ये किराणा मालाची दुकाने, रेशनिंग दुकाने, दूध तसेच आवळ्यावर प्रक्रिया करण्यारे उद्योग आहेत तसेच यंत्रांचा वापर करून शेतीही केली जाते. गावकऱ्यांना लाकडाच्या जळणामुळे घरांमध्ये होणारे प्रदूषण, विजेची चोरी आणि भरमसाट बिले, शेतीसाठी पाण्याचा तुटवडा अशा समस्यांचाही सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. यावर मात करण्यासाठी संशोधकांनी शिंगणापूरमध्ये सरकारी योजनांची अंमलबजावणी करतानाच गावाच्या विकासामध्ये गावकऱ्यांनाही सहभागी करून घेतले आणि त्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर केला.
सरकारी योजनांबद्दल जनजागृती आवश्यक
ग्रामीण भागांमधील लोकांसाठी रोजगार निर्माण करून तेथील गरिबी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या 18 योजना आहेत. परंतु निधी वितरणातील गोंधळ, राज्यांना असमान निधी पुरवठा, योजनांबद्दल जनजागृतीचा अभाव आणि प्रशासकीय दुर्लक्ष या कारणांमुळे या योजनांच्या अंमलबजावणीत यश मिळत नाही, असे या संशोधकांचे मत आहे.
असे राबवले मॉडेल…
- महिलांसाठी पाण्याचा तुटवडा दूर केला
- पुरुषांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला
- अतिरिक्त उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध केली
- उत्पादनांसाठी वातानुकूलन यंत्रणा
- शेतीसाठी पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग
- शेतीतून आलेल्या नफ्याचे योग्य नियोजन
- अतिरिक्त सोयाबिनपासून तेल काढण्यास मिलची स्थापना
- उत्पादनांची स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी सहकार्य
- तेलाच्या मिलमधील टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅस
- स्वयंसहाय्यता गट अपयशी
ग्रामीण भागांतील महिलांना सक्षम करून त्यांच्या रोजगाराच्या गरजा दूर करण्यासाठी स्वयंसहाय्यता गट स्थापन झाले. परंतु ते ग्रामीण विकासासाठी निप्रभ ठरले. कारण या गटांमधील सदस्यांमध्येच जनजागृती आणि समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे त्यांना उत्पन्न वाढवण्यात आणि छोटय़ा प्रमाणात मिळणारे उत्पन्न साठवून ठेवण्यात अपयश आले असे या संशोधकांना अभ्यासाअंती आढळले.





























































