
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या वेगवेगळ्या भागातील शेतकरी व बागायतदार यांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. तसेच शासन नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करते, परंतु शेतकरी व बागायतदार यांच्या हाताला काहीच मिळत नाही. नुकत्याच झालेला अवकाळी पाऊस आणि झालेली प्रचंड गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेले कांदा, द्राक्ष, मोसंबी, पपई, डाळिंब, टोमॅटो, कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, गहू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने अवकाळी पाऊस आणि गारपीट, नुकसानग्रस्त शेतकरी व बागायतदार यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पथक बुधवारी (दि.29 नोव्हेंबर 2023) विविध भागांना भेट देणार आहेत. शिवसेना नेते, सचिव खासदार विनायक राऊत हे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, डहाणू, पालघर या ठिकाणी भेट देणार असून त्यांच्यासोबत उपनेते नितीन बानुगडे पाटील, नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेअंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या ठिकाणी भेट देणार असून त्यांच्यासोबत उपनेते लक्ष्मण वडले, वसिम देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकद्वारे देण्यात आली आहे.


























































