
लक्ष्मीपूजनानंतर फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून वडोदरा शहरात सोमवारी रात्री जातीय हिंसाचार उसळला. शहरातील पानीघाट भागात रात्री एक वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये धुमश्चक्री होऊन तुफान दगडफेक झाली. दंगलखोरांनी अनेक गाडय़ाही पेटवल्या. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले असता एका अधिकाऱ्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यातून हा अधिकारी बचावला.
पानीगेट मुस्लिम मेडिकल कॉलेज परिसरात फटाके फोडण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यातून जातीय हिंसाचार उसळला. एका गटातील दंगलखोरांनी ओळख पटू नये म्हणून आधी स्ट्रीट लाइट बंद केली व नंतर दगडफेक सुरू केली. रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहने पेटवून देण्यात आली. दुकानांची तोडफोड करताना किमती सामानही जाळण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दंगल नियंत्रण पथक तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यांनाही लक्ष्य करण्यात आले. पोलीस उपायुक्त यशपाल जगनिया यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यातून सुदैवाने जगनिया बचावले.
दरम्यान, या घटनेनंतर पानीघाट भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आतापर्यंत 19 दंगलखोरांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.


























































