
>> विवेक दिगंबर वैद्य
वृद्धेश्वर हे तसे पाहता सर्व संप्रदायांच्या एकत्रित समागमाचा प्रत्यय देणारे अलौकिक आणि दुर्मिळ स्थान आहे. म्हणूनच, भागवतधर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन निघालेल्या आणि ज्यांनी वैष्णवांचे प्रतिनिधित्व हिरिरीने केले त्या ज्ञानेश्वर माऊलींचा वृद्धेश्वर परिसराला लाभलेला सहवास अचंबित करीत नाही. ज्ञानेश्वरांना ‘वारकरी’ संप्रदायाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ‘नाथ’ संप्रदायाचे पुरस्कर्ते म्हणूनही ते तितकेच सुपरिचित आहेत.
नाथसंप्रदायाचे विस्तृत दर्शन घडविणाऱया ‘नवनाथ भक्तिसार’ या धुंडिसुत मालूकवी लिखित ग्रंथामध्ये ‘नाथ’सिद्धांचे समाधीस्थान आणि महायोग-भंडारा सोहळ्याच्या निमित्ताने वृद्धेश्वर या अतिप्राचीन शिवालयाचा संदर्भ आणि उल्लेख करण्यात आलेला आहे.
वृद्धेश्वर क्षेत्र परिसरात नाथसंप्रदायाचा पूर्वापार वावर आहे. वृद्धेश्वर मंदिरात आपल्याला प्रवेशद्वारापाशी नंदी, गाय, भस्माची धुनी, जती मारुती तसेच गर्भगृहात स्थापित श्रीपार्वतीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्तीरूप चिन्हे आणि प्रतीके नाथसंप्रदायाच्या खुणा वागवताना दिसून येतात. नाथसंप्रदायाचे मुख्य श्रीमच्छिंद्रनाथ यांनी वृद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी धुनी प्रज्वलित केल्याचे सांगण्यात येते. पवित्र भस्म निर्माण करणारी ही ‘धुनी’ नाथसंप्रदायाची ओळख सांगत उभी आहे. वृद्धेश्वर मंदिराच्या निर्मितीकार्याला काही शतकांपूर्वीच्या इतिहासाची पार्श्वभूमी असली तरी हे स्थान येथे प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. श्रीमच्छिंद्रनाथांनी येथे स्थापन केलेल्या व काही काळानंतर शांत झालेल्या या ‘धुनी’ परंपरेला धनकवडीच्या श्रीशंकर महाराजांनी नव्याने प्रज्वलित केल्याचे सांगण्यात येते.
वृद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी गर्भगृहात पार्वतीची मूर्ती स्थापित आहे. नाथसंप्रदायात शिवासह शक्तीदेखील महत्त्वपूर्ण असते आणि हे शिवशक्तीचे वैशिष्टय़ येथे मूर्तीरूपाने साकारल्याचे दिसून येते. शिव हा शक्तीशिवाय अपूर्ण आहे व तो शक्तीच्या माध्यमातून व्यक्त होतो तेव्हाच पूर्णत्वाला पोहोचतो हे अधोरेखित करणारे येथील शिवपार्वतीचे अस्तित्व साहचर्य दर्शविणारे आहे. शिवशंकराने पार्वतीसोबत उघड केलेले गुह्य नजीक असलेल्या जलाशयात विहार करणाऱया माशाच्या पोटातील मत्स्येंद्रनाथ यांनी ऐकल्याची कथादेखील प्रसिद्ध आहेच. अशी ही शिवाला साथसोबत करणारी वृद्धेश्वरातील पार्वती येथील पंचक्रोशीची माता आहे. आसपासच्या गावातील महिला येथे पार्वतीमातेची ओटी भरतात. तिच्याकडे आपले गाऱहाणे मांडतात आणि ही प्रथा गेली कित्येक शतके यथास्थितपणे सुरू आहे.
‘शिव’ पुराणातील हनुमंत हा अकरावा रुद्र मानला जातो. त्यामुळे शक्तीची देवता अर्थात श्रीमारुती हा नाथ तसेच अन्य संप्रदायामध्ये सर्वत्र मूर्तीरूपाने स्थापन झाल्याचे पाहवयास मिळते, त्यास वृद्धेश्वरदेखील अपवाद नाही. येथील मारुती ‘जती’ या नावाने परिचित आहे. वृद्धेश्वराच्या प्रवेशद्वारापाशी नंदीसोबत गाय-वासराची मूर्तीही स्थापित आहे. नंदीच्या डाव्या बाजूस या गायीची स्थापना करण्यात आली आहे. येथील नंदी वेगळ्या स्वरूपात पाहावयास मिळतो. या नंदीच्या गळ्यामध्ये कंठाजवळ वीणाधारी नारदाची लहानशी मूर्ती आहे. काही शिवालयांमध्ये नारदाची मूर्ती धारण केलेले नंदी पाहावयास मिळतात. त्यातील काही ठिकाणी नंदीच्या कंठापाशी असलेले नारदाचे स्वरूप उभ्या किंवा बसलेल्या स्वरूपात असते. खरे पाहता देवर्षी नारद हे विष्णू भगवंताचे उपासक आहेत. मात्र तरीही त्यांचे नंदीच्या कंठापाशी असणे हे केवळ हरी (विष्णू) आणि हर (शंकर) यांचे एकमेकांप्रती असलेले साहचर्य दर्शविणारे महत्त्वाचे प्रतीक ठरते.
वृद्धेश्वर हे तसे पाहता सर्व संप्रदायांच्या एकत्रित समागमाचा प्रत्यय देणारे अलौकिक आणि दुर्मिळ स्थान आहे. म्हणूनच, भागवतधर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन निघालेल्या आणि ज्यांनी वैष्णवांचे प्रतिनिधित्व हिरिरीने केले त्या ज्ञानेश्वर माऊलींचा वृद्धेश्वर परिसराला लाभलेला सहवास अचंबित करीत नाही. ज्ञानेश्वरांना ‘वारकरी’ संप्रदायाचे प्रणेते म्हणून ओळखले जात तरीही ते ‘नाथ’ संप्रदायाचे पुरस्कर्ते म्हणून तितकेच सुपरिचित आहेत. ज्ञानेश्वरांकडे ‘नाथ’ संप्रदायी परंपरा आहे. ज्ञानेश्वरांचे पणजोबा त्र्यंबकपंत यांना साक्षात गोरक्षनाथांचा अनुग्रह लाभला होता आणि त्यांचे पुत्र गोपाळपंत यांना गहिनीनाथ यांच्याकडून पुत्रसंतती व अनुग्रह अशा दोहोंची प्राप्ती झाली होती. गोपाळपंतांचे पुत्र विठ्ठलपंत यांनाच पुढे निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई ही चार लेकरे झाली.
निवृत्तीराय यांनादेखील गहनीनाथांचा अनुग्रह लाभला होता आणि यातूनच ते पुढे निवृत्तीनाथ ही ओळख दृढ करते झाले. निवृत्तीनाथांना ‘गुरुपदी’ विराजमान करून ज्ञानेश्वरदेखील ‘ज्ञाननाथ’ झाले. जगत्कल्याणार्थ अवतरलेल्या आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभवसारख्या अलौकिक ग्रंथरचनांमधून प्रत्येकाच्या ठायी ‘जाणते व नेणते’पणाची जाणीव निर्माण करू पाहणाऱया ज्ञानेश्वरांनी वृद्धेश्वर येथे काही काळ वास्तव्य केले होते. श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या लेखनाचा संकल्प करून नेवासे येथे निघालेले ज्ञानेश्वर वाटेत काही काळ वृद्धेश्वर परिसरात थांबले. वृद्धेश्वराच्या दक्षिणेला ओढय़ाकाठचा परिसर ज्ञानेश्वरांना मोहवून टाकता झाला. वृद्धानदीपासून विलग होऊन बारोमास वाहणाऱया ओढय़ापाशी ज्ञानेश्वरांनी वास्तव्य केले आणि येथेच ज्ञानेश्वरी या संकल्पित ग्रंथ लेखनाची पहिली ओवी माऊलींनी रचली अशी ठाम श्रद्धा वृद्धेश्वरवासीयांच्या मनात दृढ झालेली आहे.
‘ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ ही ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रारंभ करणारी ओवी माऊलींनी ‘आद्य’ अर्थात आदिदेव वृद्धेश्वराला अर्पण केली अशी जनमानसात श्रद्धा आहे आणि याचा सबळ पुरावा म्हणून वृद्धेश्वर मंदिराच्या दक्षिण दिशेला असलेल्या घनगर्द पुरातन अशा वटवृक्षाकडे आणि त्याखाली असलेल्या जुन्या विहिरीकडे पाहिले जाते. माऊलींच्या येथील चैतन्यमय वास्तव्याची आठवण छोटेखानी मंदिराच्या रूपाने उभारण्यात आलेली आहे आणि तिथून जवळच असलेल्या पुरातन विहिरीला ‘ज्ञानवापी तीर्थ’ हे नाव देण्यात आले. दगडांनी बांधून काढलेल्या चौकोनी आकाराच्या या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेच्या दिशेने पायऱया बांधण्यात आलेल्या आहेत. परमेश्वराचे आदिरूप म्हणून साक्षात ज्ञानेश्वर माऊलींकडून गौरवण्यात आलेला हा आदिदेव वृद्धेश्वर जसा नाथ संप्रदायाशी जोडलेला आहे. तशाच प्रकारचे भावनिक नाते त्याने वारकरी संप्रदायाशीही प्रस्थापित केलेले आहे. या आदिनाथ वृद्धेश्वराचा त्याचप्रमाणे गर्भगिरी डोंगररांगांतील निसर्गरम्य स्थान-माहात्म्याचा उल्लेख माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये अनेक ठिकाणी केल्याचे आढळते.




























































