
हिंदुस्थानी रंगभूमीवरील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे यांना उज्जैनचा ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 15 ऍाक्टोबर रोजी उज्जैन येथे होणाऱ्या अभिनव रंगमंडळाच्या राष्ट्रीय नाटय़ महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
वामन केंद्रे यांनी नाटय़ दिग्दर्शनात केलेले धाडसी प्रयोग, आधुनिक नाटय़ प्रशिक्षणात दिलेले अमूल्य योगदान, हजारो कलाकार घडवणे, विविध नाटय़ संस्थांचा केलेला विकास आणि हिंदुस्थानी रंगभूमीला मिळवून दिलेली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा या सगळ्यांचा विचार करून त्यांना एकमताने हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
महाकवी आणि महान नाटककार कालिदास यांच्या नगरीतून मिळणारा हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी साक्षात कालिदासांचा आशीर्वादच आहे, असे मत प्रा. केंद्रे यांनी व्यक्त केले. प्रा. केंद्रे यांना मिळणारा हा सहावा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
























































