मंगल हो, जलमय हो!, मंगळावर सापडला पाण्याचा साठा

मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाच्या खाली खोलवर पाण्याचा एक मोठा साठा सापडला आहे, अशी माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. नासाच्या इनसाइट लँडरच्या डेटावरील आधारित एक संशोधन करण्यात आले असून या संशोधनानुसार, मंगळाच्या पृष्ठभागाखाली 10 ते 20 किलोमीटर खोलपर्यंत पाण्याचा भूगर्भीय साठा असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. नासाचे इनसाइट लँडर हे 2018 पासून 2022 पर्यंत कार्यरत होते.

मिशन पूर्ण झाल्यानंतर जो डेटा सादर करण्यात आला. त्या डेटाच्या आधारे शास्त्रज्ञांना हा संभाव्य जलसाठा उघड करण्यात मदत झाली आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाच्या खाली अंदाजे 11 ते 20 किलोमीटर खोलस्थित पाणी आहे. हे पाणी अग्निजन्य खडकांमध्ये साठलेले आहे. या खोलीवर तापमान पाणी टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे असते, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मंगळ ग्रह पहिल्यापासून पाण्याने भरलेला असावा, असे शास्त्रज्ञ मायकेल मंगा यांनी म्हटले आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या मंगळावरील पृष्ठभागाखाली पाण्याची उपस्थिती ही भूकंपाच्या लहरींच्या गतीचे विश्लेषण करून निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये खडकांची रचना, भेगा आणि त्या भरणाऱ्या गोष्टींवर अवलंबून या लाटा वेग बदलतात. या खडकांमधील भेगांमधून सर्व पाणी बाहेर काढले तर ते 1-2 किलोमीटर खोल जागतिक महासागर भरू शकेल, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील ग्रह शास्त्रज्ञ वाशन राइट यांनी म्हटले आहे.