
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानने पाकिस्तानला जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी रोखून धरले असून हे पाणी आता हिंदुस्थानातच साठवणे सुरू केले आहे. राजस्थान किंवा पंजाबला गरजेच्या वेळी हे पाणी दिले जाईल अशी माहिती केंद्रीय जलसंसाधन मंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली. हे पाणी रोखण्यामुळे सिंधू पाणी वाटप कराराचा भंगही होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदुस्थानातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी रोखण्यात येईल असे वक्तव्य केले होते. अखेर आता जवळपास एक महिन्यानंतर हिंदुस्थानने तीन नद्यांचे पाणी रोखले आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी रविवारी राजस्थानच्या बिकानेर येथे बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री मेघवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पूर्वेकडून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या तीन नद्यांचे 0.53 मिलियन एकर क्षेत्राचे पाणी रोखण्यात आले आहे. हे पाणी रोखून साठवून ठेवण्यात आले आहे. ज्यावेळी राजस्थान किंवा पंजाबला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा या पाण्याचा पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापर करता येणार आहे. तसेच 1960 मध्ये करण्यात आलेल्या सिंधू जल कराराचे हे उल्लंघन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधू कराराचे उल्लंघन नाही!
सिंधू करारानुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या सतलज, रावी आणि व्यास नद्यांचे सर्वाधिक पाणी वापरण्याचा अधिकार हिंदुस्थानकडे आहे आणि त्याच करारानुसार हे पाणी रोखण्यात आले आहे. तसेच पश्चिमेकडून वाहणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब नदीचे सर्वाधिक पाणी वापरण्याचा अधिकार पाकिस्तानकडे आहे.

























































