
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसांआडवरून पुन्हा दोन दिवसाआड करण्याच्या सूचना स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिल्या होत्या. आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतल्यानंतर व तातडीच्या दुरुस्तीची कामे झाल्यानंतर सोमवारी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सभापतींच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तसेच आयुक्तांची भेट घेऊन दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा अशी सूचना केली होती. आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचा अभ्यास करून आठवडाभरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. तत्पूर्वी प्रशासनाने शहरात समान पाणी पुरवठा करण्यासाठी दोन दिवसांऐवजी तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्याचे आदेश तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले होते. त्यानुसार १५ मे पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला होता. परंतु तीन दिवसाआड पाण्याचे नियोजन करूनही नागरिकांना सात ते आठ दिवसाआड पाणी मिळत असल्याच्या तक्रारी होत्या. सिडको-हडको, क्रांतीचौक, जुना शहराचा भाग, पुंडलीकनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, भीमनगर-भावसिंगपुरा, शिवाजीनगर या भागासह शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नगरसेवक सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत आक्रमक झाले होते. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्याकडील पदभार काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती.
आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचा पदभार कार्यकारी हेमंत कोल्हे यांच्याकडे सुपुर्द केला. त्यानंतर कोल्हे यांनी पाण्याचे नियोजन करणे सुरू केले. त्यांच्या दिमतीला उपअभियंता, कनिष्ठ अभियंता देण्यात आले. मनपाने पाणी टंचाई काळात पाणी वाटपाचे नियोजन तीन दिवसाआड करण्यात आले होते. सद्यस्थितीत पावसाळा सुरू झाल्यामुळे पाण्याचे नियोजन पुन्हा दोन दिवसाआड करण्याचे आदेश आयुक्तांनी सोमवारी काढले. स्थायी समितीच्या बैठकीला सुरुवात होताच सभापती राजू वैद्य यांनी शहराचा पाणी पुरवठा दोन दिवसाआड करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले असल्याची माहिती सभागृहात देताच नगरसेवकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
शहरातील नागरिकांना दिलासा
महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यासाठी आयुक्तांना आदेश देण्यात आले होते. तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याचे आदेश काढण्यात आल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
टप्प्याटप्प्याने मिळणार पाणी
सभापती राजू वैद्य म्हणाले, शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याचे आदेश काढण्यात आले असून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन केले जाईल. उद्या मंगळवारी ज्या भागात पाणी पुरवठा होणार आहे, त्या भागाला दोन दिवसाआड पाणी देण्यात येईल. हळूहळू संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला जाईल. काही भागाचा पाणी पुरवठा तीन दिवसाआड राहील. आठ ते पंधरा दिवसात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला जाईल.




























































