हात जोडून विनंती करतोय की शिवसेनेने एकत्र यावं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrakant-patil

सामना ऑनलाईन, मुंबई

भाजपकडून युतीची चर्चांबाबतच्या दाव्याची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हवा काढून टाकली आहे. मात्र तरीही भाजपचे नेते युती व्हावी यासाठी धडपड करताना दिसतायत. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय की, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आम्ही शिवसेनेला हात जोडून विनंती करतोय. पाटील यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं की, “मी मुंबईत राहणारा एक सामान्य तरुण असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने महाराष्ट्रातल्या सामान्य माणसावर, मराठी तरुणावर मुंबईतील तरुणावर काय उपकार केले आहेत याची मला जाण आहे. मी अशा वस्तीत रहात होतो जिथे दंगली झाल्यानंतर आमची आख्खी इमारत शिवसैनिक आणि त्यावेळी शिवसेनेत असलेले छगन भुजबळ वाडीमध्ये नेऊन ठेवायचे, आमचं जेवणखाणं ही तेच करायचे. त्यामुळे शिवसेनेने वेगळी भूमिका घेऊ नये ही आमची इच्छा आहे. म्हणून संवाद काय हात जोडून प्रार्थना करतोय की भाजपचं सरकार यावं म्हणून नाही तर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी एकत्र यावं”

पाटील म्हणाले की “आमचं म्हणणं काय आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आले तर 15 वर्षांचं दु:शासन येईल. म्हणून आमचं शिवसेनेला आवाहन आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय जाहीर करावा की आम्ही वेगळे लढतो, आम्ही शिवसेनेला आग्रह करणं बंद करून टाकू.”