वुई कॅन वुई विल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनघा सावंत

‘उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आणि सर्वांसाठी समान संधी’ या मुख्य उद्देशाने ‘वुई कॅन वुई विल फाऊंडेशन’ या संस्थेची निर्मिती झाली. संस्था समाजातील वंचित मुलांसाठी विविध प्रकारचे विनामूल्य शैक्षणिक उपक्रम राबवतानाच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही मोलाचे कार्य करत आहे.

समाजसेवेची उपजत आवड असलेला कांदिवली येथील पंकज ठक्कर हा तरुण आपल्या कॉलेजवयीन जीवनात रस्त्यावरील मुलांना अन्न वाटप करत असे. पुढे याच मुलांनी पंकजकडे शिकण्याचीही इच्छा व्यक्त केली. मुलांची शिक्षणाची आस पाहून त्याने आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने फुटपाथवर, मंदिरात मुलांना शिकवण्यास सुरुवात करत 2017 मध्ये ‘वुई कॅन वुई विल फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली.

संस्था नावाप्रमाणेच ‘आम्ही करू शकतो आणि आम्ही खरोखरच आमची उद्दिष्टे साध्य करू’ या ध्येयाने प्रेरित असून प्रत्येक टप्प्यावर गरीब मुलांच्या शिक्षणावर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करणे, अभ्यासेतर उपक्रमांना चालना देणे, शैक्षणिक सुविधा पुरवणे आणि समाजाला कोणत्याही प्रकारे मदत करणे या उद्देशाने उत्कृष्ट कार्य करत आहे.

‘‘आमच्या संस्थेत पहिली ते बारावीच्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा विनामूल्य पुरवल्या जातात. संस्था मुलांच्या आवडीनुसार त्यांच्यातील कलागुणांचा विकास होण्यासाठी प्रयत्नशील असतेच, शिवाय त्यांना कलागुणांना वाव मिळावा म्हणून व्यासपीठही उपलब्ध करून देते. संस्थेची मुख्य शाखा कांदिवली येथे असून बोरिवलीत तीन ठिकाणी 300 हून अधिक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत,’’ अशी भावना संस्थेचे वरिष्ठ समन्वयक सुयश पवार यांनी व्यक्त केली.

संस्था मुलांसाठी दर महिन्याला औद्योगिक संस्था, वस्तुसंग्रहालये, उद्याने, किल्ले, डेली सोपचे सेट आणि प्रदर्शने यांसारख्या ठिकाणी भेटींसाठी घेऊन जाते. मार्शल आर्ट, हस्तकला, चित्रकला, नृत्य-गायन प्रशिक्षण, कराटे, स्वयंपाक वर्ग यांचे प्रशिक्षण देतानाच संस्था संगणक आणि कोडिंगविषयक व्याख्यानेही समाविष्ट करते. वेगवेगळय़ा महाविद्यालयांच्या माध्यमातून अपघात होऊ नयेत म्हणून दुभाजकांवर रेडियम स्टीकर लावणे, समुद्रकिनारे स्वच्छ करणे अशा मोहिमा संस्था हाती घेते. संस्थेतर्फे शताब्दी रुग्णालयाबाहेरील लोकांना दररोज दुपारी अन्न वाटप, दर रविवारी रुग्णांना न्याहारी व ताज्या फळांचे वाटप केले जाते. गेली सात वर्षे बोरिवली आणि कांदिवली परिसरात दर रविवारी एकूण चार ठिकाणी विनामूल्य अन्न वाटप करते.

आपल्या क्षमतांचा सदुपयोग करत अनेक तरुण-तरुणी तसेच समाजसेवेने प्रेरित असलेली लोक पुढे येऊन संस्थेच्या कार्याला हातभार लावत आहेत.