‘आम्ही युद्ध सुरू केले नाही पण…’: इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला खणखणीत इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी सांगितले की, ‘आम्ही युद्ध सुरू केले नाही, परंतु ते आम्ही संपवू’.

‘आम्हाला हे युद्ध नको होतं. क्रूर, अत्यंत क्रूर मार्गानं आमच्यावर जबरदस्ती करण्यात आली. इस्रायलनं हे युद्ध सुरू केलं नसलं तरी इस्रायल ते संपवेल’, असं पंतप्रधान म्हणाले. शनिवारी सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात मृत्यूची संख्या मंगळवारी 1600 च्या पुढे गेली आहे.

इस्रायलवर हल्ला करून ‘ऐतिहासिक चूक’ केल्याचं हे हमासला समजेल यावर जोर देऊन नेतान्याहू म्हणाले, ‘एकेकाळी ज्यू लोक राज्यहीन होते. एकेकाळी ज्यू लोक निराधार होते. यापुढे नाही. आम्ही त्यांना अशी किंमत चुकवायला लावू की ते आणि इस्रायलच्या इतर शत्रू पुढली अनेक दशकं हे लक्षात ठेवतील’.

इस्रायली पंतप्रधान म्हणाले की, ‘निर्दोष इस्रायलींवर हमासने केलेले क्रूर हल्ले मनाला चटका लावणारे आहेत’.

‘घराघरात शिरून कुटुंबांची कत्तलं करणे, भरचौकात शेकडो तरुणांची हत्या करणे, अनेक स्त्रिया, मुले आणि वृद्धांचे अपहरण करणे, अगदी होलोकॉस्ट वाचलेल्यांचे अपहरण करणे. हमास दहशतवाद्यांनी मुलांना बांधले, जाळले आणि मारले’, अशा घटनांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

हमास आणि आयएसआयएस यांच्यात साम्य असल्याच दाखवत, नेतन्याहू यांनी आपल्या सहयोगींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ‘हमास ही आयएसआयएस आहे आणि ज्याप्रमाणे सत् शक्तींनी आयएसआयएसला पराभूत करण्यासाठी एकजूट केली, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सत् शक्तींनी हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायलला पाठिंबा दिला पाहिजे’.

युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलला पाठिंबा दर्शवणाऱ्या देशांचेही त्यांनी आभार मानले. ‘मला राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या निःसंदिग्ध पाठिंब्याबद्दल आभार मानायचे आहेत. आज इस्रायलच्या पाठीशी उभे असलेल्या जगभरातील नेत्यांचे मला आभार मानायचे आहेत. मला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या लोकांचे आणि अमेरिकन काँग्रेसचे आभार मानायचे आहेत’, असं नेतान्याहू म्हणाले.

इस्रायल केवळ आपल्या लोकांसाठीच नाही तर रानटीपणाच्या विरोधात उभ्या असलेल्या प्रत्येक देशासाठी हमासशी लढत आहे, असं ते पुढे म्हणाले. ‘इस्रायल हे युद्ध जिंकेल आणि जेव्हा इस्रायल जिंकेल तेव्हा तो संपूर्ण सुसंस्कृत जगाचा विजय असेल’, असंही ते पुढे म्हणाले.

इस्रायलच्या 1948 च्या स्वातंत्र्ययुद्धाची आठवण करून देणार्‍या अभूतपूर्व आक्रमणात शनिवारी सकाळी गाझा पट्टीवर हमासच्या दहशतवाद्यांनी हजारो रॉकेट सोडल्यानंतर आणि सीमेपलीकडे सैनिक पाठवल्यानंतर इस्रायल-हमास युद्ध सुरू झाले.