चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

चीन हा एक विकसनशील देश आहे, चीन शांततेसाठी, सहकार्यासाठी वचनबद्ध असून चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले आहे. जो काही वाद असेल तो संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न असेल असेही जिनपिंग म्हणाले. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या 75 व्या कार्यक्रमात ते बोलत होते.


गेल्या काही महिन्यांपासून चीनचे अमेरिका, तैवान आणि हिंदुस्थानसोबत संबंध बिघडले आहेत. हिंदुस्थान आणि तैवानसोबत सीमाप्रश्नसंबंधी दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. तसेच अमेरिकेनेही चीनला धारेवर धरले आहे. या पार्श्वभुमीवर चीनने शांततेचा संदेश दिला आहे. शी जिनिपिंग म्हणाले की चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही. मग ते शीत युद्ध असो वा सीमेवरील युद्ध. चीन हा सर्वात मोठा विकसनशील देश आहे. जगात शांतता टिकवण्यासाठी, सहकार्यासाठी, विकासासाठी चीन वचनबद्ध आहे. आम्ही कधीच सीमा विस्तार आणि वर्चस्ववादाची भुमिका घेतलेली नाही. अनेक देशांशी आमचा विसंवाद आणि मतभेद असतील. परंतु संवाद आणि राजनयिक माध्यमातून हे मतभेद मिटवण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही जिनपिंग म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या