
सामना प्रतिनिधी । अलिबाग
सुनिल तटकरे यांच्यावर आमचा भरवसा नाही. परंतु काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी काळजावर दगड ठेवून नाईलाज म्हणून सुनिल तटकरे यांना पाठिंवा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँगेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा निवडणूकीत सुनिल तटकरे यांना पाठिंबा द्यायचा किंवा नाही यावर विचारविनिमय करण्यासाठी आलिबाग – मुरूड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा आज अलिबाग येथील बॅ. ए. आर. अंतुले भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुधकर ठाकूर बोलत होते. अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष योगेश मगार, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनंत गोंधळी, रायगड जिल्हा महिला काँगेस अध्यक्ष अॅड. श्रध्दा ठाकूर, मुरूड तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सदस्य इस्माईल घोले यावेळी उपस्थित होते.
राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी काँगेस व मित्रपक्षांची एक – एक जागा निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करा असे आदेश पक्षश्रेष्ठीनी दिले आहेत. निवडून आल्यानंतर सुनिल तटकरे काय करतील याच आम्हाला माहित नाही. त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला त्यांचा चांगला अनुभव आहे. सुनिल तटकरेंना पाठिेबा दिल्यामुळे आमच्या पक्षाचे नुकसान देखील होणार आहे. हे आम्हाला माहित आहे. परंतु केवळ राहूल गांधी पंतप्रधान व्हावेत एवढ्यासाठीच नाईलाज म्हणून आम्ही तटकरेंना पाठिंबा देत आहोत. निवडून आल्यानंतर तटकरेंनी बेइमानी केली तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही, असे मधूकर ठाकूर यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील घरी आले तर स्वागत
सुनिल तटकरे घरी आले तसे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील तुम्हाला भेटायला घरी आले तर काय कराल, या प्रश्नाला उत्तर देताना मधूकर ठाकूर म्हणाले की, आपल्या घरी कुणीही आले तरी त्याचा अपमान करायचा नाही, हे आमचे तत्व आहे. आमचे आणि जयंत पाटील यांचे तात्विक मतभेत आहेत. ते मला भेटण्यासाठी घरी आले तर त्यांचे चहापाणी देऊन स्वागत करू परंतु मिठी मारणार नाही.
विधानसभा निवडणूक लढवणारच
लोकसभा निवडणूकीत काँगेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत शेकाप आहे, म्हणून आम्ही विधानसभा निवडणूकीत शेकापबरोबर असू असे नाही. काही झाले तरी अलिबाग विधानसभा निवडणूक आम्ही लढवणारच. आमच्या घरातलाच उमेदवार असेल. जर घरातली व्यक्ती निवडणूक लढवण्यास तयार नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून मी निवडणूक लढवेन, असे मधूकर ठाकूर यांनी सांगितले.
































































