मान्सूनचे आगमन होऊनही पाऊस मात्र लांबला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मान्सूनचे आगमन होऊनही पाऊस लांबल्याने सांगली जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे. हवामान खात्याने मान्सूनचे दमदार आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जय्यत तयारी केली. मात्र, हवामान खात्याचा दोनदा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रोज ढग येत आहेत. मात्र, पाऊस पडत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे.

सांगली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर असून, निव्वळ पिकाखालील क्षेत्र पाच लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. खातेदारांची संख्या पाच लाख 52 हजार 328 आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र तीन लाख 56 हजार 754 हेक्टर आहे. खरीप गावांची संख्या 633 असून, रब्बीचे क्षेत्र 2 लाख 20 हजार 249 हेक्टर आहे. तर, रब्बी गावांची संख्या 103 आहे. सिंचनाखालील एकूण क्षेत्र 3 लाख 63 हजार 890 असून, भूपृष्ठावरील सिंचित क्षेत्र दोन लाख 80 हजार 747 इतके, तर ठिबक, तुषारद्वारे सिंचन क्षेत्र 56 हजार 700 हेक्टर आहे.

मान्सूनही वेळेवर येणार असा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱयांनी पेरणीसाठी मोठी लगबग करून सर्व तयारी केली. मात्र, गेल्या 7 तारखेपासून आजअखेर मान्सूनच्या पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे जिह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. हवामान खात्याकडून सुरुवातीला 7 जून, त्यानंतर 11 नंतर 12 जून असे अंदाज वर्तविण्यात आले. पण आता 22 जूनपर्यंत मान्सूनची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मान्सूनपूर्व पावसाने जिह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावल्याने जिह्यात काही तालुक्यांत पेरण्या झाल्या. त्यात सर्वाधिक पेरण्या कायम दुष्काळी म्हणून ओळखणाऱया जत तालुक्यात झाल्या आहेत. जत तालुक्यात जवळपास 60 टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर, त्यापाठोपाठ शिराळा तालुक्यात झाल्या आहेत. शिराळा तालुक्यात धूळवाफेवर झालेल्या भाताच्या पेरण्या आता जोम धरू लागल्या आहेत. अन्य तालुक्यांत सरासरी पाच टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांची अडवणूक रोखण्यासाठी भरारी पथके

 खरीप हंगामासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार खते व बियाणांची आवक झाली आहे. शेतकऱयांची अडवणूक होऊ नये, यासाठी भरारी पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. दुकानदाराकडून अडवणूक झाली अथवा जादा पैसे घेतल्याचा प्रकार घडल्यास शेतकऱयांनी थेट संपर्क साधावा. संबंधित शेतकऱयांचे नाव गुप्त ठेवून कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार वेताळ यांनी दिली आहे.

खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचे नियोजन

 भात पीक – 6 हजार 732 क्विंटल, ज्वारी – 6 हजार 665 क्विंटल, बाजरी – 2 हजार क्विंटल, तूर 621 क्विंटल, मूग 327 क्विंटल, भुईमूग 1468 क्विंटल, सूर्यफूल 15 क्विंटल, मका सहा हजार 698 क्विंटल, कापूस 8 क्विंटल, सोयाबीन 39 हजार 470 क्विंटल असे एकूण 64 हजार 24 क्विंटल बियाणे, तर आवश्यक खतांचे नियोजन करण्यात आले असून, युरिया 47 हजार 469 मेट्रिक टन, डीएपी 17 हजार 919 मेट्रिक टन, एम ओपी 21 हजार 581 मेट्रिक टन, एसएसपी 20 हजार 561 मेट्रिक टन, एन. पीके. 44 हजार मेट्रिक टन असे एकूण 1 लाख 12 हजार 530 मेट्रिक टन खताचे नियोजन केले असल्याचेही कृषी अधीक्षक वेताळ यांनी सांगितले.