वेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान

46

साय-फाय चित्रपट हे कायमच नवीन शोधांना प्रेरणा देते, असे म्हटले जाते. साय-फाय चित्रपटातील कल्पना अनेकदा प्रत्यक्षात उतरल्याचे आपल्याला दिसतेच. सेलफोनचा शोध लावणाऱया मार्टिन कूपरला या शोधाची प्रेरणा ‘स्टार वॉर’ चित्रपटात वापरण्यात आलेल्या दूरसंचार साधनांपासूनच मिळाली असे तो कायम सांगतो. अशा साधनांबरोबरच इतरही अनेक कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील असतात. अदृश्य होणे अथवा एखादी वस्तू अदृश्य करणे हे तर मानवाचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे आणि जगभरातील अनेक शास्त्रज्ञ या अदृश्यतेच्या तंत्रज्ञानावरती काम करत आहेत. स्टार वॉर्समध्ये संपूर्ण स्टारशीपच अदृश्य करू शकणारे तंत्रज्ञान आपण पाहिले आहे किंवा अगदी गाजलेल्या हॅरी पॉटर चित्रपटातदेखील हॅरीकडे अदृश्य करू शकणारा अंगरखा आहे. हेच तंत्रज्ञान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सध्या शास्त्रज्ञ धडपडत आहेत. एखादी वस्तू आपल्याला दिसते, कारण प्रकाश त्या वस्तूवरून परावर्तित होत असतो, तर काळय़ा रंगाच्या वस्तू प्रकाश शोषून घेतो आणि त्यामुळे प्रकाशाचा हा अभाव आपल्याला त्या वस्तू दिसण्यास मदत होते. आता जर एखादी वस्तू अदृश्य करायची असेल तर तिच्यावरून प्रकाश परावर्तितदेखील झाला नाही पाहिजे किंवा त्या वस्तूने प्रकाश शोषूनदेखील घेता कामा नये. अर्थात त्या वस्तूवरून प्रकाशाचे वक्रीकरण व्हायला हवे आणि कुठल्याही प्रकारच्या सावल्यांचीदेखील निर्मिती होता काम नये. असे तंतोतंत घडल्यास आपल्याला ती वस्तूच दिसणार नाही, म्हणजे ती अदृश्यच होईल. खरे तर आपण थेट त्या वस्तूच्या मागचा परिसर बघू शकू. वाचायला जरी विचित्र वाटत असले तरी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावरती आधारित एक पदार्थ बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे विशिष्ट प्रकारचे मेटामटेरीयल नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवण्यात आले असून ते negative refractive index ने परिपूर्ण आहे. म्हणजेच प्रकाश कशा प्रकारे वक्र व्हावा, किती प्रमाणात परावर्तित व्हावा, अथवा शोषला जावा हे सर्व काही कंट्रोल करण्याचे सामर्थ्य या मेटामटेरीयलमध्ये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या