
या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण येत्या बुधवारी 26 मे रोजी दुपारी 3.15 ते सायंकाळी 6.23 या वेळेत होणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नसून ईशान्येकडील राज्यांत दिसेल. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण हिंदुस्थानातून होणार आहे.
चंद्र अधिक तेजस्वी
26 मे रोजी या वर्षातील अखेरच्या सुपरमूनचे दर्शन साध्या डोळ्यांनी घेता येईल. वैशाख पौणिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ तीन लाख 57 हजार 310 किलोमीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे तो मोठा आणि जास्त तेजस्वी दिसणार आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री 6 वाजून 36 मिनिटांनी मावळेल. यानंतर पुढील वर्षी 14 जून आणि 13 जुलै रोजी सुपरमून स्थिती होणार आहे; परंतु ते दिवस पावसाचे असल्याने दर्शन घेणे कठीण असल्याचे खगोल अभ्यासक, पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.



























































