विकेण्ड लॉकडाऊन असूनही ‘मेप्रो’चा व्यवसाय सुरुच, जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाला केराची टोपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱयांनी वीकेण्डला लॉकडाऊन जाहीर करून सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. असे असताना महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर मॅप्रो कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासून, आपला व्यवसाय जोमाने सुरू ठेवला आहे. एकीकडे छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांवर दंडात्मक, तर कधी सील करण्याची कारवाई केली जाते. मात्र, मॅप्रो कंपनीवर प्रशासन कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या बाबतीत सातारा जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे नियम शिथिल होण्यास थोडा वेळ लागत आहे. सध्या आठवडय़ातील काही दिवस नियम शिथिल करून शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, वीकेण्डला महाबळेश्वर व पाचगणी येथे पर्यटकांची चांगलीच वर्दळ वाढली आहे. शनिवारी महाबळेश्वर-पाचगणी रस्ता, भिलार, भौसे, नंदनवन कॉलनी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पर्यटक मुक्कामी आले होते. हे सर्व आज रविवारी चेकआऊट करून बाहेर पडले.

या पर्यटकांना महाबळेश्वर येथे कडक बंदमुळे काही खरेदी करता आली नाही. परंतु, गुरेघर येथे मॅप्रो कंपनीने आपला व्यवसाय सुरू ठेवल्याने पर्यटकांची पावले मॅप्रो कंपनीकडे वळल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासूनच घराकडे निघालेल्या पर्यटकांनी खरेदीसाठी मॅप्रो कंपनीच्या गेटवर गर्दी केली होती. या ठिकाणी त्यांना रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांबरोबरच जाम, जेली, सिरप, चॉकलेट आदी सर्व मिळत होते. त्यामुळे पर्यटक कोरोना विसरून मोठय़ा प्रमाणावर खरेदी करताना पाहायला मिळाले. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पर्यटकांनी धाब्यावर बसवला.

जिह्यात शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन असल्याने सर्व आस्थापना बंद होत्या. रेस्टॉरंटमधील पार्सल सेवादेखील वीकेंडमध्ये बंद ठेवण्याचे आदेश आहेत. महाबळेश्वर येथील सर्व व्यावसायिक या नियमांचे कोटकोरपणे पालन करीत आहेत. मॅप्रो कंपनी मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासत असताना प्रशासन तिकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मॅप्रोकडून होत असलेल्या नियमभंगाबाबतची माहिती पत्रकारांनी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांना दिली. आता प्रांताधिकारी मॅप्रो कंपनीवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.