भाजप दहशतवादी! ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

भाजप हा हिंसाचाराचे समर्थन करणारा पक्ष आहे. भाजप ही दहशतवादी संघटना आहे, असा हल्लाबोल तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजप मुस्लीम, ख्रिश्चनांमध्येच भांडण लावतो असे नाही तर हिंदूंमध्येही तेढ निर्माण करतो, असा आरोपही त्यांनी केला.

तृणमूल काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. भाजप दहशतवादी संघटना आहे, आम्ही नाही. केंद्रात सत्ता असल्यामुळे भाजपकडून एन्काऊंटर करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. बॉम्बहल्ले करण्याची भाषा भाजपकडून वापरली जात आहे. हिंमत असेल तर भाजपने पश्चिम बंगालमध्ये येऊन असे काही करून दाखवावे. भाजपला त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याची भाजपची सवय
ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याची भाजपची सवय आहे. त्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सावध रहावे. भाजपकडून ईव्हीएम छेडछाड होणार याची काळजी घ्यावी, अशी सूचना ममता बॅनर्जी यांनी केली.

मुस्लीम, ख्रिश्चनच नाही तर हिंदूंमध्येही भाजप भांडणे लावत आहे. भाजप हा असहिष्णुता आणि घमेंड असणारा पक्ष आहे.