#WestBengalElection – राजकारणात येणार का? वाचा काय म्हणाले सौरभ गांगुली….

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशातच राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे राजकारणात प्रवेश करणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच गांगुली यांना तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, ‘आयुष्याने मला बर्‍याच संधी दिल्या आहेत, आता पुढे काय होते ते पाहूया.’

गांगुली पुढे म्हणाले, ‘आता मी स्वस्थ आहे आणि मी माझे काम सुरू करणार आहे.’ पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक प्रश्नाची उत्तरे दिली. दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर निवडणूक सभेला संबोधित केले होते. या सभेत हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा सहभागी होतील अशी चर्चा होती. मात्र ते या सभेत सहभागी झाले नाही.

तत्पूर्वी बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी सौरव गांगुली यांच्या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, ‘सौरव गांगुलीबद्दल ज्या बातम्या येत आहेत, त्यात काही तथ्य नाही. यासंबंधी सौरव गांगुली अद्याप काहीही बोलले नाही आणि भाजपनेही याबाबत कोणतीही माहिती प्रसिद्ध केली नाही. जर त्यांना आमच्या पक्षात प्रवेश करायचा असेल, तर त्यांचे स्वागत आहे. मात्र अद्याप याविषयी आमची कोणतीही चर्चा झालेली नाही.’

आपली प्रतिक्रिया द्या