
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांनी आपला मुलगा शुभ्रांशुसह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. घरातला कर्ता मुलगा परत आला आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी रॉय यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली.
रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रॉय उपस्थित होते. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. त्या पक्षात राहणे कठीण आहे. भाजप सर्वसामान्यांचा पक्ष नाही. मुकुल हा आमच्या घरातील कर्ता मुलगा आहे. तो आता घरी परत आला आहे, असे ममता यांनी सांगितले. मुकुल रॉय यांच्यासोबत आपले मतभेद नाहीत. मात्र, पक्षाला धोका देणाऱ्यांना परत पक्षात घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, काही कारणाने पक्षातून दूर झालेले परत पक्षात येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
सध्या पश्चिम बंगालमधील परिस्थिती बघता, कोणीही भाजपमध्ये राहू शकत नाही. त्यामुळे आपला मुलगा शुभ्रांशुसह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे मुकुल रॉय यांनी सांगितले. आपले ममता बॅनर्जी यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत तृणमूलला मिळालेल्या विजयामुळे अनेकजण तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये शुभेंद्रु अधिकारी यांचे महत्त्व वाढत होते. त्यामुळे रॉय परत तृणमूलमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत होते. बंगालमध्ये भाजप पत्त्यांच्या बंगाल्याप्रमाणे कोसळेल, असे रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर तृणमूलचे नेते सुखेंद्रु शेखर रॉय यांनी सांगितले.
बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर अनेकजण तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेत भाजपचे राज्यसभा खासदार स्वप्न दासगुप्ता यांनी पक्षातील गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षातील कोणालाही नाराज होत पक्ष सोडण्याची गरज नाही. भाजप राज्यात पकड आणखी मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत मुकुल रॉय यांना 6 वर्षापू्वी तृणमूल काँग्रसमधून काढण्यात आले होते. मुकुल रॉय यांचे स्थान पक्षात महत्त्वाचे होते. तसेच पक्ष सोडल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली नव्हती. त्यामुळे तृणमूल प्रवेशात त्यांना अडचण आली नाही. तसेच ममता यांच्याशी त्यांचे मतभेदही नव्हते. रॉय यांच्या तृणमूल प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.



























































