
पश्चिम रेल्वेच्या बेफिकीर कारभाराने लाखो प्रवाशी रोज मेटाकुटीला येत असतानाच आज संध्याकाळी गुजरातहून मुंबईकडे निघालेल्या मालगाडीचे सात डबे पालघर स्थानकात घसरले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली, तर पालघर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वे रूळ व स्लिपर्स उखडल्याने रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱया लांब पल्ल्याच्या गाडय़ा व लोकल ठिकठिकाणी रखडल्या, तर अनेक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. ऐन संध्याकाळी ही घटना घडल्याने कामावरून घरी जाणारे चाकरमानी लटकले.
गुजरातहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी 40 डब्यांची मालगाडी संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी पालघर स्थानकात येताच अचानक सात डबे मोठा आवाज करत उलटले. चाकेही निखळून पडली. रेल्वे रूळ तर पूर्णपणे उखडून गेला आहे. मालगाडी फलाट क्रमांक 2 वरून जात असताना ही घटना घडली. मालगाडीचे सात ते आठ डबे रुळाबाहेर फेकले गेले असून स्लिपर्ससह रूळही तुटले. पालघर स्थानकातून गाडी जात असताना काही डबे पुढे गेले तर मागील डबे घसरून पडले. या मालगाडीच्या जागी एखादी प्रवाशी गाडी असती तर मोठा अनर्थ झाला असता. तसेच जीवितहानीदेखील झाली असती.
लोखंडी कॉईल्स विखुरल्या
दुर्घटनाग्रस्त मालगाडी लोखंडी कॉईल घेऊन मुंबईकडे जात होती. त्यामुळे गाडीचे वजनही मोठय़ा प्रमाणावर होते. या सर्व कॉईल्स रेल्वे रुळावर विखुरल्या असून मालगाडीचे डबे व अवजड कॉईल्स उचलण्यासाठी पश्चिम रेल्वेची यंत्रणा तातडीने दाखल झाली आहे.
एसटीच्या विशेष गाडय़ांची सोय
मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने पालघर स्थानकावर ताटकळत असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडय़ांची व्यवस्था केली. मुंबई, बोरिवली, वसई, विरार, ठाण्यासाठी खास बसेस सोडण्यात आल्या. रेल्वे प्रवाशांचा ताण एसटीवर पडला असून सर्व बसेस खचाखच भरून गेल्या आहेत.
खाण्यापिण्याचे वांदे
पालघर स्थानकातील दोन व तीन नंबरच्या ट्रकवरून मुंबईच्या दिशेने गाडय़ा जातात. नेमके याच ठिकाणी मालगाडी घसरल्याने सर्व वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली असून त्यांची कोंडी झाली आहे. आधीच उन्हाळा व त्यात मालगाडी उलटल्याचे विघ्न यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. रात्री उशिरापर्यंत फलाटावर प्रवाशी रखडले. त्यांचे खाण्यापिण्याचेही वांदे झाले होते.
लोकल सेवा सुरळीत होण्यास 2 दिवस लागणार
रेल्वेचे अधिकारी, पोलीस व आपतकालीन पथकेदेखील पालघर स्थानकात आली असून मालगाडीचे डबे उचलण्यासाठी व्रेन्स आणल्या आहेत. घटनास्थळी पोलीस फौजफाटादेखील तैनात केला असून रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किमान दोन दिवस लागण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.
































































