
अतुल कांबळे । मुंबई
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली या महत्त्वाकांक्षी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. मात्र सहाव्या मार्गिकेचा आड शक्ती मिलसह मालाड येथील संरक्षक दलाची जागा मिळविणे आणि विलेपार्ले, बोरिवली येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. असे असतानाच शक्ती मिलच्या मालकाने कोर्टातून स्थगिती आणल्याने अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प दोन अंतर्गत तयार होत असून त्यासाठी ९१८.५३ कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. या मार्गिकेचे काम बोरिवली ते वांद्रे (१७ कि.मी.) आणि वांद्रे टर्मिनस ते मुंबई सेंट्रल अशा दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यासाठी १७४६ चौरस मीटर जागेची तर दुसऱ्या टप्प्यासाठी ८८.५७ चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. पहिला आणि दुसरा टप्पा मिळून एकूण ४६३ अतिक्रमणे हटविणे शिल्लक असल्याने या मार्गिकेचे काम रखडले आहे.
मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत होणार असून पहिला वांद्रे टर्मिनस ते बोरीवली दरम्यानचा टप्पा अनेक इमारतीच्या पुनर्वसनामुळे रखडला आहे. या टप्प्यासाठी १७४६ चौरस मीटर जागा हवी असून त्यात विलेपार्ले (दक्षिण)येथील नऊ जागा मालकांपैकी चार मालकांनी पुनर्वसनासाठी संमती दर्शविली आहे. मालाड पश्चिम येथील ५६३ चौरस मीटर तर बोरिवली येथे ३४९ चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. मालाड पूर्व येथे संरक्षक दलाच्या जागेसाठी बोलणी सुरू आहेत.
मार्च २०२१ ही डेडलाइन टळण्याची शक्यता
वांद्रे ते मुंबई सेंट्रल या दुसऱ्या टप्प्यासाठी ८८ चौरस मीटर जागा आवश्यक असून त्यासाठी शक्ती मिलच्या जागेचे उपजिल्हा अधिकाऱ्याने अद्याप मूल्यांकन केलेले नाही. दरम्यान, शक्ती मिलची मालकाबरोबरील लीजचा करार सरकारने ऑगस्ट २०१४ सालीच संपुष्टात आणला असला तरी मिल मालकाने हायकोर्टात जाऊन स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठीची मार्च २०२१ची डेडलाइन चुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाचव्या मार्गिकेचे दुखणे कायम
सांताक्रुझ आणि माहीममधील पाचव्या मार्गिकेचे उरलेले काम सहाव्या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यासोबतच मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय आहे. वांद्रे ते खार हार्बर लाइन जोडणाऱ्या खार ते वांद्रे रेल्वे पुलाचे काम रखडल्याने पाचवी मार्गिका अडचणीत आली आहे. या पुलाच्या खाली अतिरिक्त ट्रक टाकण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. हा नवीन पूल उभारण्याचे काम सुरू असून तो वांद्रे ते मुंबई सेंट्रल या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कळीचा मुद्दा ठरला आहे.






























































