व्हेल माशाची उलटी विकणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतीत नुकसान झाल्याने व्हेल माशाची उलटी विकून पैसे कमवण्यासाठी मुंबईत आलेल्या एकाला आरे पोलिसांनी अटक केली. योगेश श्रीधरराव जोशी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पाच किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. जप्त केलेल्या उलटीची किंमत सुमारे 15 कोटी रुपये इतकी आहे.

गोरेगाव परिसरात एक जण व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक ज्योती देसाई यांच्या पथकातील उपनिरीक्षक उल्हास खोलम आणि पथकाने तपास सुरू केला. योगेश हा गोरेगाव परिसरात आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली. याची माहिती वनरक्षक विभागाला दिली.

योगेश हा मूळचा बीडचा रहिवासी असून त्याचे एम. फार्मापर्यंतचे शिक्षण झाले आहे. शेतीत नुकसान झाल्याने त्याने पैसे कमवण्यासाठी व्हेल माशाची उलटी विक्री करण्याचे ठरवले. तो पहिल्यादाच व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी मुंबईत आला होता. व्हेल माशाच्या उलटीप्रकरणी योगेशला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला ती उलटी कोणी दिली होती याचा तपास आरे पोलीस करत आहेत.