2021 मध्ये जगाचा अंत होणार ? 3000 वर्षांपूर्वीच्या कॅलेंडरवरून उलटसुलट चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 1500 वर्ष अगोदर माया संस्कृती उदयास आली होती. या संस्कृतीच्या काळात तयार करण्यात आलेल्या कॅलेंडरमध्ये 21 डिसेंबर 2012 नंतर कोणत्याही तारखेचा उल्लेख करण्यात आला नव्हता. याचा अर्थ लावण्यात आला की या तारखेनंतर पृथ्वीवर भयंकर संकट येईल आणि जगाचा अंत होईल. मायन संस्कृती ही जवळपास साडेतीन हजार वर्ष जुनी संस्कृती आहे. त्या काळाच्या तुलनेत अतिप्रगत ज्ञान प्राप्त असलेल्या संस्कृतींमध्ये मायन संस्कृतीचा समावेश केला जातो. मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये या संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात. या संस्कृतीने दिनगणनेसाठी एक कॅलेंडर तयार केलं होतं. याच कॅलेंडरवरून ‘जग नष्ट होणार’ ही चर्चा सुरू झाली.

कॅलेंडरमध्ये 21 डिसेंबर 2012 नंतर कोणत्याही तारखेचा उल्लेख नसल्याने जगाच्या अंताच्या तऱ्हेतऱ्हेच्या कल्पना रंगवण्यात आल्या. कोणी सांगितलं की महाप्रलय येईल , कोणी सांगितलं की तारा किंवा ग्रह पृथ्वीवर आदळून जनजीवन नष्ट होईल तर कोणी सांगितलं की ज्वालामुखीचा महाभयंकर स्फोट होईल. हॉलीवूडमधील चित्रपटांनीही या खुळ्या कल्पनांना हवा देण्याचं सातत्यानं काम केलं. माया संस्कृतीती विद्वानांना अंतरीक्षाबद्दलही ज्ञान होतं हे या संस्कृतीचा बारकाईन अभ्यास करणाऱ्यांनी सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. असं असल्यामुळे या अफवांना अजून जोर मिळत राहिला. 2012 साल उलटून आता 8 वर्ष झाली असली तरी माया संस्कृतीतील कॅलेंडर आणि त्याच्या अवतीभोवती गुंफलेल्या अफवा सातत्याने उठवल्या जात असतात. 2012 नंतर पुढची तारीखच नसल्याने हा महाप्रयल कधीही येऊ शकतो असं अफवा उठवणाऱ्यांचं म्हणणं असतं.

21 डिसेंबर 2012 नंतरची तारीख कॅलेंडरमध्ये का नव्हती?

माया संस्कृतीतील लोकांनी हे कॅलेंडर गोल आकाराच्या दगडावर कोरलेलं होतं. 21 डिसेंबर 2012 नंतरच्या तारखांसाठी जागाच नसल्याने हे कॅलेंडर तिथेच संपलं होतं. मात्र त्याचा अर्थ अफवा पसरवणाऱ्यांनी असा लावला की माया संस्कृतीतील लोकांच्या मते या तारखेनंतर जगाचा अंत होणार आहे. नासाने या अफवांची सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच स्पष्ट केलं होतं की जगाचा अंत होणार नाहीये. मात्र असं असतानाही अनेकांच्या मनात अझूनही जग नष्ट होणार ही भीती कायम असून कोरोनाच्या फैलावानंतर ही भविष्यवाणी खरी ठरणार अशी अफवा अनेकांनी पुन्हा पसरवायला सुरुवात केली होती.