कोरोना रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून प्राचीन औषधांचा विचार

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीचे संशोधन सुरू आहे. मात्र, लसीचा प्रभाव आणि सुरक्षिततेबाबत साशंकता असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोना रोखण्यासाठी प्राचीन औषधांचा पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे. डब्लूएचओने शनिवारी आफ्रिकेतील हर्बल औषधांच्या चाचणीच्या प्रोटोकॉलचे समर्थन केले आहे.

कोरोना रोखण्यासाठी विविध पर्यायांचा विचार जगभरातून होत आहे. या जागतिक संकटावर मात करण्यासाठी प्राचीन औषधांचा पर्याय शोधण्याचा डब्लूएचओचा विचार आहे. आफ्रिकेतील मदागास्करचे राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांनी मलेरियाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी वनस्पती आर्टमिसीया पेयाचा प्रसार केल्यानंतर डब्लूएचओकडून याबाबतचा विचार करण्यात येत आहे. या आर्टमिसीया पेयाला कोविड ऑर्गेनिक्स ड्रिंक असेही म्हणण्यात येत आहे. हे पेय कोरोना रोखण्यासाठी उपयोगी असल्याचे राजोएलिना यांनी सांगितले आहे. त्यामुळे आफ्रिकेसह इतर देशांमध्येही या पेयाची मागणी वाढली आहे. डब्लूएचओतील तज्ज्ञ आणि इतर आरोग्य संस्थेतील तज्ज्ञांनी आफ्रिकेतील या हर्बल औषधीच्या क्लिनीकल चाचणीच्या प्रोटोकॉलचे समर्थन केले आहे. या टप्प्यातील चाचणी या हर्बल औषधाचा परिणाम, प्रभाव,सुरक्षितता आणि दुष्परिणाम या बाबींसाठी निर्णायक ठरणार आहे.

हे प्राचीन हर्बल औषध सुरक्षित असून प्रभावी असल्याचे चाचणीतून निष्पन्न झाल्यास या औषधीच्या वेगवान निर्मितासाठी डब्लूएचओ पुढाकार घेईल, असे संघटनेचे प्रादेशिक संचालक प्रॉस्पर टुमुसीम यांनी सांगितले. प्राचीन औषधांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता आहे. मात्र, त्याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज टुमुसीम यांनी व्यक्त केली. या चाचण्यांच्या निष्कर्षानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या