तरणतलावाचे सीसीटीव्ही बंद का होते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपासून नेमके तरणतलावाचे सीसीटीव्ही बंद होते, त्याचवेळी मगरीचे पिल्लू तरणतलावात रात्रीच्या वेळी सोडण्यात आले. हे सीसीटीव्ही बंद का होते, असा प्रश्न तरणतलावाच्या प्रशासनाला कोणी विचारला नाही. मगरीचे पिल्लू तलावात सोडून त्याचे खापर झूच्या माथ्यावर फोडण्याचा डाव रचण्यात आला होता. मात्र, वन विभागाच्या चौकशीनंतर हा सारा डाव उघड झाला, अशी माहिती वाईल्ड लाईफ वंडरर नेचर फाऊंडेशनचे विश्वस्त आणि झूच्या डॉ. नंदकुमार मोघे यांनी दिली. दरम्यान, मरीन ऍक्वा झूवरील मुंबई महापालिकेच्या तोडक कारवाईचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ संयुक्त महाराष्ट्र दालन स्मारक आणि महापालिकेच्या तरणतलावाच्या मधल्या भागात 1986 पासून वाईल्ड लाईफ वंडरर नेचर फाऊंडेशन ही सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यरत आहे. फाऊंडेशनची ही जागा संस्थेचे विश्वस्त आणि वन्यजीव व प्राणिसंग्रहालय सल्लागार डॉ. नंदकुमार मोघे यांना कायमस्वरूपी लीजवर देण्यात आली आहे.

मगर रात्रीची फिरत नाही

मगर हा असा प्राणी आहे की, जो रात्रीचा फिरत नाही. त्याचबरोबर ती भिंतही चढू शकत नाही, कपाऊंडही चढू शकत नाही, असे असताना ती मगर झूची भिंत ओलांडून तरणतलावात गेली, हा दावा साफ चुकीचा आहे, असे मोघे म्हणाले.

जागेचा व्यावसायिक वापर करण्याची ऑफर

प्राणिसंग्रहालयातून काहीही आर्थिक उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे दादर मरीन ऍक्वा झूच्या जागेचा व्यावसायिक वापर करा आणि बक्कळ पैसे कमवा. तुम्हाला शक्य नसेल तर जी जागा आम्हाला वापरायला द्या आणि तिचा व्यावसायिक वापर करतो, अशी खुली ऑफर एका व्यावसायिकाने दिली होती. ती ऑफर मी नाकारली म्हणून सुडबुद्धीने हा कट रचला गेला, असा आरोप डॉ. नंदकुमार मोघे यांनी केला.

मुलांना, विद्यार्थ्यांना प्राण्यांची माहिती व्हावी

बोरिवलीचे नॅशनल पार्क, माहीमचे निसर्ग उद्यान विकसित करण्यात माझे योगदान आहे. वन्य जीवांसंबंधी माझा दांडगा अभ्यास आहे. निसर्ग, वन्यजीवांच्या सोबतीने अनेक आजार, विकार बरे होतात आणि निरोगी माणूस निसर्गात रमला तर आजार त्याच्यापासून चार हात लांब राहतात. झू बंद करून मला तिथे अन्य कोणतीही गोष्ट करायची नाही. माझ्याकडे जे प्राणिसंग्रहालय आहे तेच मला वाढवायचे आहे, त्याचे जतन करायचे आहे. मुलांना, विद्यार्थ्यांना, सर्वांना इथे येऊन प्राण्यांची माहिती घ्यावी, त्यांचे जगणे अनुभवावे, अशी माझी इच्छा आहे, असेही मोघे म्हणाले.