सुरक्षा रक्षक नेहमीच काळा गॉगल का वापरतात?

उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण ही गरज म्हणून शोध लागलेल्या गॉगलचे रूपांतर आता फॅशन ऍक्सेसरी मध्ये झाले आहे आणि लहान मुल असो की ज्येष्ठ नागरिक, स्त्री असो की पुरुष, प्रत्येकाला आपल्याकडे स्टायलिश, ब्रँडेड आणि ट्रेंडी गॉगल असावा असे वाटते. ह्या गॉगलने इतके सगळ्यांना वेड लावले आहे की लग्नामध्ये स्पेशल ‘काला चष्मा’ पोज असलेला फोटो काढल्याशिवाय लग्नाचा अल्बम हल्ली पूर्णच होत नाही.

तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक आवड म्हणून, चैन म्हणून किंवा गरज म्हणून विविध स्टाईलचे, विविध रंगाचे गॉगल वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की जगात असे ही लोक आहेत ज्यांच्या ड्रेस कोड मध्येच ‘काला चष्मा’ म्हणजेच ‘काळा गॉगल’ लावणे सक्तीचे आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की मोठ मोठ्या लोकांबरोबर जे त्यांचे सुरक्षा रक्षक असतात त्यांनी सतत काळाच गॉगल का लावलेला असतो? एका मिनिटासाठी सुद्धा ते त्यांचा काळा गॉगल डोळ्यावरून काढत नाहीत. हे कशासाठी ? उन्हापासून बचाव म्हणून? फॅशन म्हणून? की सामान्य लोकांना कळावं ते सुरक्षा रक्षक आहेत म्हणून ? सुरक्षा रक्षकांनी काळा गॉगल लावणे ह्या मागे खूप महत्वाची कारणे आहेत. त्यांचे गॉगल लावणे त्यांना त्यांचे काम चोखपणे करण्यास मदत करते. त्यांच्या काळा गॉगल लावण्यामागे एक महत्वाचे कारण आहे की त्यांना ज्या व्यक्तीची सुरक्षा करण्याची जबाबदारी दिलेली असते त्यासाठी चौफेर नजर ठेवावी लागते. गर्दीतील प्रत्येक व्यक्तीवर त्यांना बारीक लक्ष ठेवावे लागते, पण ते कुणाकडे बघत आहेत ह्याचा कुणालाही बारीकसाही संशय येऊ नये, कोणालाही हे कळू नये म्हणजेच कोणाचं लक्ष न वेधून घेता सर्वांवर लक्ष ठेवता यावे ह्या साठी त्यांना सतत काळा गॉगल डोळ्यांवर घालून राहावा लागतो. जर कधी काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला, म्हणजेच गर्दीमध्ये अचानक कोणी बंदुकीने फायरिंग सुरु केले किंवा ज्वालाग्रही पदार्थाचा स्फोट केला तर आपसूकच आपले डोळे आपोआप मिटले जातात. पण सिक्युरिटी गार्डस ना ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपले डोळे मिटून घेण्याची परवानगी नाही. अशा वेळी त्यांच्या डोळ्यांच्या मदतीला धावून येतात त्यांचे काळे सनग्लासेस! ह्याच काळ्या गॉगल्स मुळे ते डोळे उघडे ठेवून पण स्वतःच्या डोळ्यांचे संरक्षण करू शकतात. आपली देहबोली आपल्याविषयी बरेच काही सांगत असते. सुरक्षा रक्षकांना संशयित व्यक्ती त्यांच्या देह्बोली वरून लगेच ओळखण्याचे खास प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे एखाद्याच्या केवळ उभे राहण्याच्या किंवा काही विशिष्ट देहबोलीवरून ते थांगपत्ता लावू शकतात व संशयिताला वेळीच पकडून अनुचित प्रसंग टाळता येऊ शकतो. अशा संशयितांना संशय येणार नाही ह्या साठी त्यांना त्यांचा काळा गॉगल लावूनच गर्दीचे नीट निरीक्षण करता येते. गर्दीमधल्या लोकांची देहबोली नीट ओळखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना आपली नजर तेज ठेवावी लागते. लांबून सुद्धा कोणाच्या जर काही संशयास्पद हालचाली सुरु असतील तर त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. ह्यासाठी डोळ्याची भरपूर काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण सतत अथांग गर्दीवर बारीक नजर ठेवणे सोपे काम नव्हे. त्याने डोळ्यांवर भरपूर ताण येतो व कामात चूक होण्याची शक्यता असते. हाच डोळ्यांवरील ताण कमी व्हावा तसेच प्रखर सूर्यप्रकाश, वातावरणातील धूळ, कचरा , जोरात सुटलेलं वारं ह्या पासून डोळ्यांना जपण्यासाठी सुरक्षा रक्षकांना कायम काळा चष्मा डोळ्यांवर लावावा लागतो. कारण त्यांचे डोळे आणि लोकांना अचूक ओळखण्याची कला म्हणजेच त्याचं प्रमुख सुरक्षा अस्त्र आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे.