
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदूस्थानच्या क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीची रनमशीन ही ओळख सर्वांनाच माहीत आहे. क्रिकेटचा हा स्टार फुटबॉलचाही कट्टर चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू होण्याच्या आधी सहकाऱ्यांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटणारा विराट सर्वांनीच पाहिला आहे. विराटचा पोर्तुगाल संघातील ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वात जास्त आवडता खेळाडू आहे.
रविवारी रात्री विराटनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत कोहलीनं फुटबॉलच्या सामन्यातील रोनाल्डोचे गोल करतानाचे क्षण त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. या व्हिडीओद्वारे कोहलीनं रोनाल्डोची प्रशंसा करत G.O.A.T. असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या या व्हिडीओतून रोनाल्डोला दिल्या गेलेल्या G.O.A.T.च्या उपमेचा खरा अर्थ ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ असा असल्याचं विराटनं सांगितलं आहे.
फीफा वर्ल्डकप २०१८ च्या फुटबॉलच्या सामन्यात रोनाल्डोनं आतापर्यंत ४ गोल केले आहेत. रोनाल्डोच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर पोर्तुगालने बलाढ्य स्पेनला बरोबरीत रोखले तर मोरोक्कोचा १-० पराभव केला होता. रोनाल्डोच्या पुढे फक्त इंग्लंडचा हॅरी केन असून त्याच्या नावावर ५ गोल आहेत. पोर्तुगालचा सामना सोमवारी इराणसोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास किंवा बरोबरी साधल्यास पोर्तुगालचा अंतिम १६मधील प्रवेश निश्चित होईल. या सामन्यातही रोनाल्डो दमदार कामगिरी करेल अशी फुटबॉल प्रेमिंना आशा आहे.




























































