निवडून आल्यास बालविवाहावर पोलीस हस्तक्षेप करणार नाही, भाजप उमेदवाराचे वचन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांनी मोठ मोठी वचने देण्यास सुरूवात केली आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील भाजप महिला उमेदवाराने निवडून येण्यासाठी मतदारांना अजब वचन दिले आहे. ’जर आपण निवडून आलो तर बाल विवाहात पोलीस हस्तक्षेप करणार नाही’ असे वचन त्यांनी मतदारांना दिले आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओच सध्या व्हायरल होत आहे. शोभा चौहान असे या महिला उमेदवाराचे नाव आहे.

चौहान म्हणाल्या की, “बाल विवाह सुरू असताना तो रोखण्यासाठी पोलीस येतात. तुम्ही नशीबवान आहात कारण आपल्याकडे सत्ता आणि संघटना दोन्ही आहेत. जेव्हा असा प्रश्न निर्माण होईल तेव्हा मी माझ्या परीने तो प्रश्न सोडवीन परंतु जेव्हा हा प्रश्न वरच्या स्तरावरील असेल तेव्हा वरून उपाययोजना करून मी हा प्रश्न सोडवीन असे मी वचन देते.” दोन दिवसांपूर्वी रायपूर भागातील पिपलिया कला गावात त्यांनी हे भाषण केले. मृत्यू भोज आणि बाल विवाहात पोलीस आडकाठी करतात अशी तक्रार उपस्थित लोकांनी केली. त्यावर शोभा चौहान यांनी ही घोषणा केली.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत चौहान यांना दोन नोटीस बजावण्यात आल्या. बाल विवाहात पोलीस न येण्याचे वचन आणि धार्मिक ठिकाणी सभा घेतल्या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.