अमेरिकन सैन्य युद्धात उतरणार नाही, पण युक्रेनच्या इंच-इंच जमिनीचे रक्षण करणार! – बायडेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियाकडून राजधानी कीव्हमध्ये हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. एकीकडे रशिया युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यात येईल असे म्हटले.

जो बायडेन म्हणाले की, रशियाने सहा दिवसांपूर्वी एक चुकीचे पाऊल उचलले असून याची किंमत रशियाला मोजावी लागणार आहे. हुकुमशाहीला जोरदार प्रत्युत्तर देण्याची गरज असून आर्थिक निर्बंध लावून रशियाची कोंडी करणार असल्याचे बायडेन म्हणाले. तसेच नाटो देशांच्या रक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध असून अमेरिका कायम युक्रेनसोबत आहे. युक्रेनच्या प्रत्येक इंच जमिनीचे रक्षण करू. आम्ही एकत्र येऊन रशियाला धडा शिकवू, असेही बायडेन म्हणाले.

युक्रेनच्या धाडसाचे कौतुक

पुतीन यांना वाटले की ते युक्रेनला चिरडू शकतात, पण युक्रेनने रशियाला तोडीस तोड उत्तर दिले आहे. युक्रेनच्या धाडसाचे कौतुक आहे. युक्रेनच्या नागरिकांच्याही धाडसाचे कौतुक, ते संपूर्ण जगासाठी आदर्श आहेत, असेही बायडेन यावेळी म्हणाले. तसेच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचेही कौतुक बायडेन यांनी केले.

युद्धात सहभागी होणार नाही

अमेरिका प्रत्यक्ष युद्धात सहभागी होणार नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनमध्ये अमेरिका सैन्य पाठवणार नाही. अमेरिकेचे सैन्य थेट युद्धात सहभागी होणार नाही, पण युक्रेनला मदत करत राहणार असे बायडेन म्हणाले. तसेच त्यांनी युक्रेनला एक बिलियन डॉलरची मदत देणार असल्याचीही घोषणा केली. तसेच पुतीन सध्या वेगळे पडले असून आधी असे नव्हते. सध्या युरोपियन युनियनचे 27 देश युक्रेनसोबत आहेत, असेही ते म्हणाले.

आर्थिक कोंडी करणार

अमेरिकेचै सैन्य युद्धात सहभागी होणार नसले तरी आर्थिक निर्बंध लावून रशियाची कोंडी करणार असल्याचे बायडेन म्हणाले. तसेच रशियाच्या विमानांसाठी एअरस्पेस बंद करत असल्याची घोषणाही त्यांनी केली. आताच्या घडीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पुतीन द्वारे युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाचा उल्लेख रशियाला कमजोर आणि दुनियेतील इतर देशांना ताकदवर असा केला जाईल, असेही बायडेन म्हणाले.